सोलापूर :  सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे.  कुंभमेळाच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का आल्याची प्राथमिक माहिती आहे.  महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहेत. नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती.  


सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं वयाच्या 55 वर्षी निधन झाल्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. महेश कोठे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली निवडणूक लढवली होती. मात्र,त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.  


महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्रबल्य होते.  सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पडल्या आहेत. तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोठे यांचा प्रवास राहिला. 


महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती. राजकारणातील आणि समाजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची ओळख आहे. सोलापूरमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. 


2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर महेश कोठे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.  नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले होते. 



विधानसभा निवडणूक लढवली पण अपयश


महेश कोठे यांनी चार ते पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांना अपयश आलं होतं. मात्र, महापालिकेच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व होतं. महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे सध्या आमदार आहेत. महेश कोठे यांचे 14-15 नगरसेवक सोलापूरमध्ये निवडून यायचे.  


सोलापूरचे सर्वात तरुण महापौर


महेश कोठे हे सोलापूर महापालिकेच सर्वात तरुण महापौर होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते देखील होते.


इतर बातम्या : 


बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची उचलबांगडी? शिंदे गटाने मुख्यमंत्री फडणवीसांना प्रस्ताव पाठवला


Nagpur News : ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठी फूट; नागपूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश