मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांना वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विधान सभा निवडणुकीत महायुतीचे जागावाटप (Mahayuti Seat Sharing) नेमकं कसं होईल यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, लोकसभेच्या (Lok Sabha Result) स्ट्राईक रेटवरच महायुतीचे जागावाटप ठरेल, अशी माहिती 'एबीपी माझा'ला उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.


राज्यात दिवाळी आधीच विधानसभा निवडणुकाचे फटाके फुटणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र त्याआधी चर्चा रंगलीय ती म्हणजे महायुतीच्या जागा वाटपाची. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीला 80 ते 90 जागा मिळायला हव्या असं वक्तव्य केले. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असल्याचे सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच महायुतीत आता जागा वाटपावरून धुसफुस पाहायला मिळतेय. मात्र 'एबीपी माझा'ला मिळालेल्या उच्चस्तरीय सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा ही लोकसभेच्या निकालानंतर होईल. त्यामुळे 4 तारखेला कोणाला किती जागा मिळणार याकडे, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे. 


लोकसभेचा स्ट्राईक रेटच ठरवणार महायुतीचे विधानसभेचे जागावाटप


ज्या पक्षाचा लोकसभेत स्ट्राइक रेट चांगला त्या पक्षालाच मिळणार विधान सभेत जास्तीच्या जागा. जिंकून येणे हे एकमेव धोरण डोळ्यासमोर असल्यानेच विधान सभेसाठी लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेट महायुतीत महत्त्वाचा असणार. तर दुसरीकडे काल 70-80 जागांवर लढण्याची भाषा करणाऱ्या छगन भुजबळ यांनी मंगळवारी यू-टर्न घेतला.  भाजप आमचा मोठा भाऊ आहे. त्यामुळं त्यांना जास्त जागा मिळणार आहेत. बाकी दोन पक्षांना चांगल्या जागा मिळतील, असे विधान छगन भुजबळ यांनी केले. 


लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 15 जागा मिळवण्यात यश मिळवले होते. विधानसभा निवडणुकीत देखील शिवसेना शिंदे गटाची हीच रणनीती असणार. शिंदे गटाच्या नेत्यांना  लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील भाजपा आमचा मान राखेल असा विश्वास वाटतोय, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.


आणखी वाचा


विधानसभेवरुन रस्सीखेच, भुजबळ म्हणाले 80-90 जागा देण्याचा शब्द; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं


काल विधानसभेच्या 80-90 जागा मागितल्या, आज विधानपरिषदेसाठी दंड थोपटले; भुजबळ म्हणतात, शिक्षक मतदारसंघात आपण लढलंच पाहिजे