मुंबई : गेल्या 15 दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला अखेर आज विधानसभा निवडणुकांची तारीख समजली असून राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर केल्या. त्यानुसार, महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha) मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे, राज्यात दिवाळीनंतर देखील पुन्हा एकदा दिवाळीसारखेच पण राजकीय फटाके फुटणार आहेत. गत 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या (Election) तुलनेत यंदा 1 महिना उशिराने निडणुका पार पडत आहेत. विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ 15 दिवसांत तयारी करावी लागणार आहे. कारण, 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे. तर, 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल.  त्यामुळे, राजकीय पक्षांना लवकरात लवकर उमेदवारांची घोषणा करावी लागेल. त्यात, मनसे (MNS) व वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेत अनुक्रमे 7 व 21 उमेदवार जाहीर केले आहेत. 


देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. तर, 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरावा लागणार आहे. म्हणजेच, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागेल. त्यामुळे, पुढील 4 ते 5 दिवसांत राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करावी लागणार आहे. मात्र, आत्तापर्यंत उमेदवारांची घोषणा करण्यात मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली आहे. राज ठाकारे यांनी मनसेच्या 7 उमेदवारांची आत्तापर्यंत अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 21 मतदारसंघात वंचितच्या 21 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. 


नांदेड पोटनिवडणुकीचीही तारीख ठरली


दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं होतं. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचंही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान व निकाल जाहीर होईल.  


अर्ज भरण्यासाठी सुट्टीचे दिवस वगळता 6 दिवसच


राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरला सुरू होणार असून अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरला संपणार आहे. म्हणजेच, अर्ज भरण्यासाठी आजपासून फक्त 14 दिवस उरले आहेत. त्यामध्येही तारखा आणि सुट्ट्यांचा विचार करता दिवस कमी मिळतात. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची धावपळ होणार हे नक्की. दरम्यान, 30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे, 22 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत सुट्ट्यांचे दिवस वगळता अर्ज भरण्यासाठी केवळ 6 दिवसच उमेदवारांना असणार आहेत. तर, निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे, आजपासून तयारीसाठी केवळ 14 ते 15 दिवसच उमेदवारांच्या हाती राहिले आहेत.  


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं  वेळापत्रक


निवडणुकीचं नोटिफिकेशन - 22 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणी - 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया समाप्त - 25 नोव्हेंबर  2024


नांदेड लोकसभा पोटनिवडणूक


अर्ज भरण्याची तारीख - 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख - 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख - 20 नोव्हेंबर
मतमोजणी - 23 नोव्हेंबर


हेही वाचा


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम, अर्जाची तारीख, मतदान अन् निकाल; A टू Z अपडेट