Maha Vikas Aghadi Seat Sharing : राज्यातील विधानसभा निवडणुकांचं (Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. यंदाची विधानसभा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही. राज्यातील सत्तासंघर्ष, त्यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत बंडाळीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) यांच्या चुरस रंगणार आहे. अशातच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दोन महत्त्वाच्या आघाड्यांकडून जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी चर्चा, मनधरणी सुरू आहे. अशातच राज्यातील महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जवळपास सर्व जागांवर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे.
ट्रायडंट हॉटेलवर शनिवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून सुरू झालेल्या जागावाटपाच्या बैठका रात्री एक वाजेपर्यंत सुरू होत्या. काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा होता. याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शनिवारी पार पडली. जवळपास सर्व जागांवर चर्चा पूर्ण झालेली आहे, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांनी बैठकीनंतर दिली आहे.आज किंवा उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीची यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. या 58 उमेदवारांमध्ये अल्पसंख्यांक समुदायाचा एकही उमेदवार नाही. लोकसभेला अल्पसंख्यांक समाजानं महाविकास आघाडीच्या पदरात भरभरून मतदान केलं होतं. त्यामुळे अल्पसंख्यांक समुदायाला संधी मिळावी, अशी शरद पवार पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाली. या 58 मतदारसंघात अणुशक्ती नगर विधानसभेचा समावेश नसल्याची सूत्रांची माहिती आहे. अजूनही 27 उमेदवार निश्चित होणे बाकी असल्याची माहिती आहे.
थोरल्या पवारांचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवर भर
जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वर भर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या 100 उमेदवारांची नावं जाहीर करणार
दरम्यान, शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री महाविकास आघाडी एकत्रित उमेदवार जाहीर करणार की, प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर करणार याबाबत निर्णय घेण्यात आला. जर महाविकास आघाडी म्हणून निर्णय झाला तर रविवारी 100 उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रावादी काँग्रेस 85 जागांवर लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे.