Sanjay Raut On Amit Thackeray मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने जोरदार तयारी केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आतापर्यंत 52 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha Election 2024) तिकीट देण्यात आलं आहे. अमित ठाकरे निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष माहीत विधानसभेतील या लढतीकडे राहणार आहे.
अमित ठाकरेंना (Amit Thackeray) माहीम विधानसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार की नाही?, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माहीममध्ये आता थेट तिरंगी लढत होणार आहे. याचदरम्यान अमित ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलगा- संजय राऊत
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर आदित्य ठाकरेंविरोधात 2019 च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी कोणताच उमेदवार दिला नव्हता, हे सर्व कोणत्याही उपकाराची परतफेड करण्यासाठी राज ठाकरेंनी केलं नव्हतं. आम्ही कोणत्याही मदतीची अपेक्षा करत नाहीय, आम्ही लढायला सज्ज आहोत, असं विधान अमित ठाकरेंनी केलं. यावर संजय राऊत म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षाच्या विविध भूमिका असतात. ही निवडणूक महायुद्धासारखी लढली जाईल. महाराष्ट्रद्रोह्यांना मदत कोणी करतं हे जनता बघेल, असं संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अमित ठाकरे आमच्याच घरातला मुलागा आहे. निवडणुकीत लढावं लागतं, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या विधानामुळे अनेकांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.
माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे; उद्धव ठाकरेंचा आदेश
माहीममध्ये विजय ठाकरे गटाचाच होणार आहे. 23 तारखेला आम्ही जल्लोषमध्ये आम्ही तुमच्याशी बोलू. पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं. आम्हाला म्हणाले की, मला बाकी काही नको, माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे. एकदिलाने काम करा, बाकी सत्ता आपलीच आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे महेश सावंत यांनी म्हटले. आम्ही माहीममध्ये कामाला सुरुवात केली आहे. आता अमित ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांनी द्यावा. पण उद्धव साहेबांनी आम्हाला लढ सांगितलं आहे. मग आम्ही जिंकूनच पुन्हा मातोश्रीवर येणार, असेही महेश सावंत यांनी म्हटले.