मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) या दोन्ही आघाड्यांतील काही घटकपक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वेगवेगळ्या मतदरसंघांमधी उमेदवार जाहीर होताच त्या-त्या पक्षांतील इतर नेते अनेक जागांवर बंडाचं निशाण हाती घेत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकूण 38 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या पक्षापुढेही बंडखोरांना थोपवण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. असे असतानाच आता अर्जुनी मोरगाव या जागेसाठी अजित पवार यांच्यापुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण येथील मनोहर चंद्रिकापुरे (Manohar Chandrikapur) यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची भेट घेतली आहे. 


मनोहर चंद्रिकापुरे नाराज?


मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अर्जुनी मोरगा मतदारसंघातील नेते मनोहर चंद्रिकापुरे हे नाराज आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली आहे. वडेट्टीवार यांच्या नागपूर निवासस्थानी ही भेट झालेली आहे. अजित पवार यांनी चंद्रिकापुरे यांना अर्जुनी मोरगाव या जागेसाठी तिकीट दिलेले नाही. त्यानंतर वडेट्टीवार-चंद्रिकापुरे यांच्या झालेल्या भेटीला आता विशेष महत्त्व आले आहे. 


अर्जुनी मोरगाव येथून कोणाला तिकीट? 


अजित पवार यांनी 23 ऑक्टोबर रोजी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण 38 जागांसाठी उमेदवार देण्यात आले. यामध्ये अर्जुनी मोरगाव या मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेसाठी अजित पवार यांनी राजकुमार बडोले यांना तिकीट दिले आहे. दोन दिवसांपूर्वीच बडोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. म्हणजेच अजित पवार यांनी अर्जुनी मोरगाव या जागेसाठी आयात उमेदवाराला तिकीट दिले आहे. त्यामुळे चंद्रिकापुरे हे नाराज असल्याचे म्हटले जात आहे. 


2019 साली चंद्रिकापुरे-बडोले यांच्यात लढत


राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यात त्यांचा मोठा राजकीय प्रभाव आहे.  2009 ते 2014 या कालावधित ते पहिल्यांदा भाजपाकडून आमदार राहिले. 2014 सालच्या निवडणुकीतही त्यांनी याच जागेवरून बाजी मारली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद देण्यात आले. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (संयुक्त) नेते  मनोहर चंद्रिकापुरे आणि बडोले यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत बडोले यांचा अवघ्या 718 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता.  


हेही वाचा :


Maha Vikas Aghadi Seat Distribution : महायुतीच्या जागावाटपावर मोठी अपडेट, मुख्यमंत्री थेट दिल्लीत जाणार; आता पुढची चर्चा राजधानीतच!