Maharashtra Vidhan Parishad Chairman : महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदाची (Maharashtra Legislative Council Chairman) निवडणूक आगामी हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Assembly Session) होणार का? याची उत्सुकता आहे. विधान परिषदेमध्ये जवळपास 21 जागा रिक्त आहेत. अशा स्थितीमध्ये भाजपला (BJP) बहुमताचा आकडा गाठता येऊ शकतो. त्यामुळे ही संधी साधून भाजप नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सभापती बसवणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.


गेल्या आठ महिन्यापासून महाराष्ट्रात विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. आता ही निवडणूक येत्या हिवाळी अधिवेशनात होणार का? याची उत्सुकता लागली आहे. सध्या विधान परिषदेत तब्बल 21 जागा रिक्त आहेत. त्यापैकी 12 जागा या राज्यपाल नियुक्त कोट्यातून येतात. तर शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा जागा रिक्त आहेत. एवढ्या जागा रिक्त असल्यामुळे याचा फायदा भाजपाला होऊ शकतो.


विधान परिषदेत सध्या बलाबल काय?


भाजप 22


शिवसेना (उद्धव ठाकरे) 11


राष्ट्रवादी काँग्रेस 9


काँग्रेस 8 


जदयू, शेकाप, रासप प्रत्येकी  1


अपक्ष 4


सभापतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला 29 मतांची गरज
सध्या विधान परिषदेचे संख्याबळ 57 इतके आहे. भाजपकडे 22 सदस्य आहेत. निवडणूक झाली तर ती जिंकण्यासाठी भाजपला 29 मते लागतील, म्हणजे आणखी सात मतांची गरज लागणार आहे. मित्रपक्ष आणि अपक्षांच्या साथीने याची जुळवाजुळव होऊ शकते.
 
सभापतीपदासाठी राम शिंदे यांच्या नावाची चर्चा
सध्या विधान परिषदेचे उपसभापतीपद हे उद्धव ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहे. त्यामुळे सभापतीपद आपल्याकडे यावं यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. विधान परिषदेच्या सभापतीसाठी भाजपकडून राम शिंदे (Ram Shinde) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. अहमदनगरच्या कर्जतमधून दोन वेळा विधानसभेवर निवडून आलेले राम शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पण मागील विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर त्यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे. आता त्यांना विधान परिषदेचे सभापती म्हणून संधी देण्यात येईल अशी चर्चा आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र विधान परिषदेला नवा सभापती मिळणार का? याची उत्सुकता लागली आहे.


VIDEO : Maharashtra Vidhan Parishad : विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे? सभापतीपदासाठी भाजपच्या हालचाली