Aurangabad News: भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान औरंगाबादमधील अनेक संघटना चंद्रकांतदादा पाटील यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. आज पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) गणपती संस्थानमध्ये दर्शनासाठी पोहचलेल्या चंद्रकांत पाटील यांना अखिल भारतीय महात्मा फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे (Black Flags) दाखवण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चंद्रकांत पाटील आज सकाळी औरंगाबादच्या गणपती संस्थानमध्ये दर्शनासाठी आले होते. याचवेळी अखिल भारतीय महात्मा फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे अचानक आलेल्या आंदोलंकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची दमछाक उडाल्याचं पाहायला मिळाले. मात्र काही वेळातच पोलिसांनी आंदोलंकर्त्यांना ताब्यात घेऊन, त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्यांची देखील यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
चंद्रकांत पाटील यांनी काल केलेल्या विधानावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर चंद्रकांत पाटील हे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असून, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर औरंगाबाद शहरातील वेदांतनगर पोलीस ठाण्यात पाटील यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटलांची दिलगिरी...
पैठणच्या संत पिठाच्या कार्यक्रमात बोलतांना, शाळा चालू करण्यासाठी फुले- आंबेडकरांनी भीक मागितली असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेत टीका केली आहे. तर अनेक ठिकाणी विरोधकांकडून आंदोलन देखील करण्यात आले. त्यामुळे अखेर चंद्रकांत पाटील यांनी फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या विधानामुळे कोणाचं मन दुखावले गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे पाटील म्हणाले. सोबतच आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.