Vidha Parishad Election 2023:  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर (Teachers and Graduate constituency Election) मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.   नाशिक,  अमरावती,  नागपूर,  औरंगाबाद आणि कोकण या विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक होत आहे.  नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसने अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  


30 जानेवारीला मतदान, 2 फेब्रुवारीला निकाल 


निवडणुकीची अधिसूचना येत्या 5 जानेवारीला निघणार आहे. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर यासाठी 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.


2 पदवीधर, 3 शिक्षक मतदारसंघ 


जून-जुलैदरम्यान झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात सत्तापालट झाली होती. त्यानंतर आता पुन्हा विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत आहे. यामध्ये अमरावती आणि नाशिक हे दोन मतदारसंघ पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद हे शिक्षक मतदारसंघ आहेत.  


निवडणूक कार्यक्रम


निवडणुकीची अधिसूचना येत्या 5 जानेवारीला निघणार आहे. 


12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 


यासाठी 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल. 


भाजपचे उमेदवार कोण?  


भाजपकडून पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी विद्यमान आमदारांनाच संधी देण्याचं जवळपास निश्चित केलं आहे. यामध्ये अमरावती मतदारंसघात  विद्यमान आमदार रणजित पाटील आणि नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी विद्यमान आमदार ना गो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. 


काँग्रेसकडून या नावांची चर्चा 


अमरावती पदवीधर निवडणूक (Amravati Padvidhar Election)


सुधीर ढोणे (Sudhir Dhone) 


दरम्यान, काँग्रेसने अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.  त्यासाठी दिग्गजांच्या नावाची चर्चा आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी सुधीर ढोणे यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे. सुधीर ढोणे हे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. गेले दोन वर्ष ते पदवीधर निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. 
 
सुनील देशमुख (Sunil Deshmukh)


दुसरीकडे माजी अर्थराज्यमंत्री तसंच जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाचे मंत्रिपद भूषवलेले नेते सुनील देशमुख हे सुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. ते काँग्रेसमधील वजनदार नेते श्रीकांत जिचकर,अविनाश पांडे यांच्या फळीतील नेते आहेत. 


बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख (Aniruddha Deshmukh)


अमरावती जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बबलू उर्फ अनिरुद्ध देशमुख हे सुद्धा उमेदवार यादीतील चर्चेत असलेलं नाव आहे. अनिरुद्ध देशमुख हे अमरावतीतील सहकार क्षेत्रातील वजनदार नाव आहे. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना लढत दिली होती.


नाशिक पदवीधर निवडणूक (Nashik Padvidhar Election)


डॉ सुधीर तांबे (Sudhir Tambe) 


डॉ सुधीर तांबे हे विधानपरिषदेचे काँग्रेस गटनेते आहेत. 2009 पासून नाशिक मतदारसंघावर त्यांची पकड आहे. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ त्यांनी खेचून आणला होता. सुधीर तांबे हे काँग्रेस विधी मंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आहेत.  


संबंधित बातम्या 


MNC Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने विधान परिषदेच्या निवडणुका लांबणीवर?