Maharashtra ST Bus मुंबई: शासनाने एसटी कर्मचार्‍यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला. एप्रिल 2020 पासून हा निर्णय लागू होईल,असे जाहीर केले. मात्र वेतनवाढ देताना मात्र 1 एप्रिल 2024 पासून देऊन कर्मचाऱ्यांची फसवणूक केलीय. दरम्यान, आता पुन्हा निधीची कमतरता असल्याचे कारण देत या वर्षी दिवाळी भेट रक्कम सुद्धा न देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे दिवाळी भेट रक्कम कर्मचार्‍यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Srirang Barge) यांनी केला आहे. ते आज (सोमवार) वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीसाठी वाशिम शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 


शासनाने वेतनवाढ एप्रिल 2020 पासून लागू केल्याची घोषणा केली, परंतु ही वेतनवाढ एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. ही एस टी कर्मचार्‍यांची घोर फसवणूक आहे. शासनाने कर्मचाऱ्यांची 3100 कोटी रुपयांची फरकाची रक्कम ढापली असून या फरकाबद्दल कुठलीच स्पष्टता नाही. 2016 पासूनची वार्षिक वेतनवाढ फरक रक्कम प्रलंबित असून 2018 पासूनची महागाई भत्त्याची फरक रक्कमही प्रलंबित आहे. या दोन्ही रक्कमा अंदाजे 800 कोटी रुपयांची  होत आहेत. ही रक्कम देण्यात कर्मचार्‍यांची फसवणूक झाली असून सरकारने लबाडी केल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.


वाढीव महागाई भत्त्याच्या मंजूरीची फाईल सरकार दरबारी पडून


एसटी कर्मचाऱ्याना सद्या 46% इतका महागाई भत्ता मिळत असून राज्य सरकारी कर्मचार्‍यांना तो जानेवारी 24 पासून 50 % इतका मिळत आहे. त्या मुळे  सरकार दरबारी पडून असलेली 4% वाढीव महागाई भत्त्याची फाईल सरकारने तात्काळ मंजूर करावी, अशी मागणीही महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.


दिवाळी भेट रक्कम मिळण्याची शक्यता धूसर


एसटी कर्मचार्‍यांना दरवर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना पाच हजार इतकी रक्कम देण्यात आली होती.सदरची घोषणा परिवहन खात्याचे मंत्री म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती. पण त्याला लागणारा 55 कोटी रुपयांचा निधी सरकारने दिला नव्हता. त्यामुळे या वर्षी निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून ही रक्कम न  देण्याचा घाट घातला जात असल्याचे समजते आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या मेहनतीमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. त्यामुळे सरकारने दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. गेल्या वर्षी प्रमाणे नुसती घोषणा करून फसवणूक करू नये. असेही बरगे यांनी या वेळी सांगितले.


एसटी स्थानक परिसर काँक्रीटीकरण 


एमआयडीसीकडून स्थानक परिसर क्राँक्रीटकरणांसाठी एसटीला 500 कोटी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी एसटीच्या वर्धापन दिनी केली होती. एसटीने  मागणी करून सुद्धा ही रक्कम एसटीकडे न देता एमआयडीसीने ती परस्पर अनेक स्थानक परिसरिसरात कामे सुरू केली. ही कामे दर्जाहीन असून यात मोठ्या प्रमाणात अपहार होत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास वाशीम आगारातील काँक्रीटीकरण पाहिले तर त्याचा दर्जा चांगला नाही. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे नाव, कामासाठी लागणारी अपेक्षित रक्कम, त्याचा कालावधी आणि आर्किटेक्टचे नाव कामाच्या ठिकाणी लिहिलेले नाही. हा नियमांचा भंग असून हे काम थांबविण्यात यावे आणि राज्यातील सर्व कामे थांबवून ही रक्कम  एसटीकडे वर्ग करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


हे ही वाचा