Maharashtra Assembly Elections 2024 : निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांचे उत्पन्न, संपत्ती आणि गुन्हे विषयक प्रतिज्ञापत्र सादर करावे लागतात. मात्र आता निवडणुकीत उभे राहणाऱ्या आणि विधानसभेत जाऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी आणखी एक प्रतिज्ञापत्र सादर करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  "महाराष्ट्र शिवी मुक्त समाज अभियान" (Maharashtra Shivi Mukt Samaj Abhiyan) तर्फे निवडणुकीत उभे राहणार्‍या उमेदवारांसमोर एक आगळीवेगळी मागणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत उभे राहणाऱ्या सर्व उमेदवारांनी ते प्रचाराच्या काळात आणि नंतर विधिमंडळात जाऊनही शिवीगाळ करणार नाही, शिव्यांचा वापर करून विरोधकांवर हल्लाबोल करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अपेक्षा महाराष्ट्र शिवी मुक्त समाज अभियानने व्यक्त केली आहे.


यासाठी शिवी मुक्त समाज अभियानातील कार्यकर्ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना भेटून त्यांनी प्रचारात आणि नंतर आमदार म्हणून विधिमंडळात शिवी देणार नाही, असे हमीपत्र लिहून देण्याची मागणी करणार असल्याची माहिती शिव्या मुक्त समाज अभियानाचे संयोजक डॉ. अंबादास मोहिते यांनी दिली आहे.


स्त्री पुरुष समानतेचा ही अवमान 


आई आणि बहि‍णीच्या नावाने दिल्या जाणाऱ्या शिव्या संपूर्ण स्त्री जातीचा अवमान आहे. तसेच हे घटनेने बहाल केलेल्या स्त्री पुरुष समानतेचा ही अवमान आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याकडून कोणत्याही परिस्थितीत शिव्यांचा वापर होणार नाही, अशी अपेक्षा स्वाभाविक असून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी या संदर्भात समाजापुढे आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा असल्याचे मोहिते म्हणाले.


मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान कसं करायचं?


जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ओळखपत्र नसलं तरी चालेल, पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची (Voter Slip) प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. फक्त या निवडणूक स्लिपसोबत तुम्ही खालील पैकी एक कागदपत्र मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकता:


1. पासपोर्ट


2. आधार कार्ड


3. पॅन कार्ड


4. ड्रायव्हिंग लायसन्स


5. मनरेगा कार्ड


6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड


7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड


हेही वाचा: