मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे.  एकीकडे राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा आणि इच्छुकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्याचवेळी पडद्यामागून गुप्तपणे राजकीय चाली रचल्या जात आहेत. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. वरळीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 


वरळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट पार पडल्याचे सांगितले जाते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय चर्चा झाली. शिवडी, वरळी माहीम या तीन विधानसभा मतदारसंघात पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अन्य ठिकाणी सहकार्य करावे, याबाबत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.


राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत महायुतीच्या उमेदवारांना सर्व ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसेकडून स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


वरळीत कोणाला उमेदवारी?


आदित्य ठाकरे  हे वरळी विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता. मात्र, आता राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढल्याने त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या पराभवासाठी महायुतीला मदत केली जाऊ शकते. वरळीत मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, भाजपकडून शायना एनसी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, आता राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत नेमके काय घडले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता वरळीत काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.


राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवायचा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठरवल्याचे समजते. त्यामुळे आता राज ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात महायुतील मदत करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


आणखी वाचा


मोठी बातमी: उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये पहिली बंडखोरी? बबनराव पाचपुते तातडीने सपत्नीक फडणवीसांच्या बंगल्यावर