Maharashtra Guardian Minister: विधानसभेच्या निकालानंतर जवळपास दोन महिन्यांनी सर्व जिल्ह्यांची पालकमंत्रिपदं (Maharashtra Guardian Minister) जाहीर झाली. मात्र रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्र्यांवरुन महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला. पालकमंत्रिपदांच्या घोषणेच्या 48 तासात दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान महायुतीच्या पालकमंत्र्यांच्या यादीवरुन ठाकरे गटाच्या "सामना अग्रलेखा'तून निशाणा साधला आहे.
23 नोव्हेंबर 2024 रोजी सत्तेत आलेल्या सरकारचे पालकमंत्री जिह्यांना मिळायला 18 जानेवारी, 2025 हा दिवस उजाडावा लागला. त्यातही 'सह' नेमून काही पालकमंत्र्यांचा 'पाय' मोडका करण्यात आला आहे. 'नकोशा' जिह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याचे दुःख काहींच्या वाट्याला आले आहे तर ज्यांना या पदाने ठेंगा दाखविला त्यांना आदळआपट करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, असा टोला सामना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राला गतिमान वगैरे करण्याच्या बाता राज्यकर्ते करीत असतात, परंतु मंत्रिमंडळ शपथविधी आणि खातेवाटपाप्रमाणेच पालकमंत्रीपद नेमायला त्यांना महिना लागला. 'मंदगती' सरकारचे आणखी एक रखडलेले वाटप संपले एवढेच काय ते म्हणता येईल. त्यामुळे ना जिह्यांना गती मिळणार आहे ना राज्याला, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
'सह'चे त्रांगडे का निर्माण केले, त्यातून काय साध्य होणार?
महाराष्ट्र सरकारचा आणखी एक रखडलेला सोपस्कार पार पडला आहे. खातेवाटपाच्या तब्बल महिनाभरानंतर राज्यातील 37 जिह्यांच्या पालकमंत्रीपदांची यादी अखेर जाहीर झाली. खरे तर प्रशासकीय व्यवस्थेत पालकमंत्री अशा कुठल्याही पदाचा ना उल्लेख आहे ना स्थान. ती निव्वळ एक राजकीय सोय आहे, मात्र ही सोय करायलादेखील राज्यकर्त्यांना महिन्यानंतरचा मुहूर्त लाभला. आता ज्यांना पालकमंत्रीपदाची लॉटरी लागली त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. मात्र ज्यांना ती लागली नाही त्यांच्या नाराजीचे तीर-कामठे लगेचच सुटू लागले आहेत. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना रायगड जिह्याचे पालकमंत्रीपद परत मिळाल्याने शिंदे गटाचे फलोत्पादन मंत्री नाराज झाले आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. महाडमध्ये तर त्यांच्या समर्थकांनी या नियुक्तीविरोधात मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको केला. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आस लावून बसलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यालाही वाटाण्याच्या अक्षताच मिळाल्या. या दोघांच्या मदतीसाठी जळगावचे पालकमंत्रीपद पुन्हा मिळालेले पाणीपुरवठामंत्री सरसावले आहेत. अर्थात त्याचा आता काही उपयोग नाही हे सांत्वन करणाऱ्यांनाही माहिती आहे आणि सांत्वन करणारे भरल्यापोटी ढेकर देत आपल्या उपासमारीवर सहानुभूती दाखवीत आहेत, हे 'ठेंगा' मिळालेल्यांनाही माहिती आहे. पुन्हा काही जिल्ह्यांत 'सहपालकमंत्री' पदाचे त्रांगडे अडकविण्याचा नवीन प्रयोग विद्यमान सरकारने केला आहे. मुंबई उपनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री आणि सहपालकमंत्री नेमण्यात आले आहेत. खुद्द मुख्यमंत्री ज्या गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत तेथेही एक 'सहपालकमंत्री' असतील. हे 'सह'चे त्रांगडे का निर्माण केले, त्यातून काय साध्य होणार, ती कोणाची सोय आहे की त्यातून कोणाची गैरसोय करण्यात आली आहे, हे मुख्यमंत्र्यांनाच माहिती.
'पडद्यामाग'चे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत असे होऊ नये-
राज्यातील दोन 'उप'मुख्यमंत्र्यांशिवाय आता तीन जिह्यांत 'सह' पालकमंत्री असतील. तिकडे चंद्रकांतदादा, पंकजा मुंडे, हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळाल्याच्या आनंदापेक्षा 'दिलेल्या' जिह्याचे दुःख पचविणे अवघड जाणार आहे. शिवाय आपल्या जिह्याचे नवे पालकमंत्री तेथे काही गडबड तर करणार नाहीत ना, या भीतीचे ओझे त्यांना वागवावे लागेल ते वेगळेच. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे प्रचंड टीका होत असलेल्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आले नसले तरी हा निर्णय राज्यकर्त्यांनी मनापासून घेतलेला नाही. जनमताचा प्रचंड रेटा आणि राजकीय मजबुरी यामुळे धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. आता त्यांच्या जिह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. ते पुण्यासह बीडची जबाबदारीही सांभाळतील, मात्र 'पडद्यामाग'चे पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत असे होऊ नये. मुंडे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा ते नामधारी होते आणि त्या पदाची सूत्रे संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराड हलवायचा, असे उघडपणे बोलले जाते.
ना जिह्यांना गती मिळणार आहे ना राज्याला...-
आता बीडसाठी मुख्यमंत्र्यांनी काढलेला मधला मार्ग तशीच धूळफेक ठरणार नाही याची काय खात्री? पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा असेच होणार असेल तर या पापाचे प्रायश्चित्त सत्ताधारऱ्यांना जनताच देईल. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सत्तेत आलेल्या सरकारचे पालकमंत्री जिह्यांना मिळायला 18 जानेवारी 2025 हा दिवस उजाडावा लागला. त्यातही 'सह' नेमून काही पालकमंत्र्यांचा 'पाय' मोडका करण्यात आला आहे. 'नकोशा' जिह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याचे दुःख काहींच्या वाटयाला आले आहे तर ज्यांना या पदाने ठेंगा दाखविला त्यांना आदळआपट करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. एकंदरीत विद्यमान महाराष्ट्र सरकारचा 'रखडपट्टी' आणि 'खरडपट्टी' कारभार हा असा मागील पानावरून पुढे व्यवस्थित सुरू आहे. महाराष्ट्राला गतिमान वगैरे करण्याच्या बाता राज्यकर्ते करीत असतात, परंतु मंत्रिमंडळ शपथविधी आणि खातेवाटपाप्रमाणेच पालकमंत्रीपद नेमायला त्यांना महिना लागला. 'मंदगती' सरकारचे आणखी एक रखडलेले वाटप संपले एवढेच काय ते म्हणता येईल. त्यामुळे ना जिह्यांना गती मिळणार आहे ना राज्याला..., असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
संबंधित बातमी:
नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय?