Maharashtra Politics : दुसऱ्या राज्यातील निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळांची (Maharashtra Cabinet Meeting) बैठक रद्द केली. आधी प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) केली. आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार (Bihar) दौऱ्यावर आहेत. बिहारला रवाना होण्यापूर्वी मुंबईत माध्यमांशी संवाद साधना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
'महाराष्ट्रासाठी एक तास दिला तर चुकीचं झालं नसतं'
आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची बातमी मला ऐकू आली. ही बैठक का रद्द झाली तर दुसऱ्या राज्यात प्रचार सुरु आहे. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवलेली आहे, पण या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी एक तासही नाही. गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत. पहिल्यांदा आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले,आता मंत्रिमंडळ पाठवलं. पण महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही. मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे. दुसऱ्या राज्यात प्रचार करावा याबाबत आक्षेप नाही, पण महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे. ओला दुष्काळ आहे, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी एक तास जरी दिला तर काही चुकीचं झालं नसतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केली.
खासगी विमानाने आदित्य ठाकरे बिहारला रवाना
युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आज एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील पाटणा इथे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई आणि शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी तसंच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात आणि देशात घडत असलेल्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळवरुन खाजगी विमानाने बिहारला रवाना झाले आहेत.
'दोन तरुण नेत्यांमधील ही भेट'
बिहार दौऱ्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी आज बिहार दौऱ्यावर आहे. पाटणाला जाणार आहे. खासकरुन तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहे. मुख्य म्हणजे आम्ही एकाच वयाचो आहोत. त्यांचं काम योग्य रितीने चाललेलं आहे. अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते. भेटीत राजकीय भूमिका नाही. अनेक दिवसांपासून आमच्यात फोनवरुन चर्चा सुरु होती. आम्ही सरकारमध्ये असताना ते बिहारमध्ये विरोधात होते. त्यावेळी सल्लामसलत होत असे. पहिल्यांदाच आमची प्रत्यक्षात भेट होणार आहे. तिसरी आघाडी यावर आता चर्चा करु नका. त्यावर मोठे नेते चर्चा करतील. ही भेट दोन तरुण नेत्यांमधील आहे."
ज्या लालू प्रसाद यादवांनी राम मंदिराचा रथ अडवला होता, त्यांच्याच मुलाला आज आदित्य ठाकरे भेटत आहेत, अशी टीका होत आहे. "ज्यांनी पीडीपीसोबत युती केली होती, त्यांनी आमच्यावर टीका करु नये," असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं.