PRP-Balasahebanchi Shiv Sena Alliance : एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे पीपल्स रिपब्लिकन पक्ष (Peoples Republican Party) आणि बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) पक्षाची अखेर युती झाली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि प्रा. जोगेंद्र कवाडे (Prof. Jogendra Kawade) यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल," असं प्रा. जोगेंद्र कवाडे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्राला धाडसी मुख्यमंत्री लाभला : प्रा. जोगेंद्र कवाडे
यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, बऱ्याच दिवसांपासून या युतीची बोलणी सुरु होती. महाराष्ट्राला आज एक धाडसी मुख्यमंत्री लाभला आहे. हे सर्व सामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती सर्वसामान्य जनतेने दिली आहे. सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रभावित होऊनच आम्ही या युतीचा निर्णय घेतला आहे. शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांची ही युती आहे. गोरगरीबांच्या वंचितांच्या हक्कासाठी ही युती काम करेल. ही युती महाराष्ट्रात पाच जाहीर सभा घेणार आहेत. तिथे हजारोंच्या संख्येत लोक येतील.
शिंदे हे भीम सैनिकांप्रमाणे संघर्षातून वर आले : जोगेंद्र कवाडे
या पत्रकार परिषदेत जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, "एका कामासाठी वारंवार उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भेट घेतली, आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती. पण त्यांनी त्या निवेदनाची साधी पोचपावतीही दिली नाही. तर एकनाथ शिंदेंना याचबाबतीत भेटलो तर ते पटकन म्हणाले बाबासाहेबांच्या नावाची वास्तू तुटतेच कशी? हा दोघांमधला फरक आहे. एकनाथ शिंदे हे सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्माला आले नाहीत. काही जण बाप लिडर होता, म्हणून लिडर झाले आहेत. शिंदे हे भीम सैनिकांप्रमाणे संघर्षातून वर आले आहेत. त्यामुळे या युतीचा अभिमान आहे."
आमचा संघर्ष साधा सोप्पा नव्हता : एकनाथ शिंदे
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांचं युतीत स्वागत केलं. "पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची युती झाली आहे. आमचा संघर्ष साधा सोप्पा नव्हता, तुम्हा सर्वांना इतिहास माहित आहे. कवाडे यांनीही फार मोठा संघर्ष केला आहे. इथे कोणी देण्याघेण्याासाठी आलेले नाहीत. तुम्ही असा अर्थ जोडू नका. ज्यांना आमच्या पक्षाचे विचार पटतील त्यांचं स्वागत आहे. लोकसभेत शिवसेना आणि भाजप युती क्लीन स्विप करेल," असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
युतीचा राजकारणावर कसा परिणाम होणार?
दरम्यान याआधीच पीपल्स रिपब्लिकन पार्टीने बाळासाहेबांची शिवसेनेला साथ दिल्याचं पत्रक काढलं होतं. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या युतीत प्रा. कवाडे यांच्या पीआरपीचाही समावेश झाला आहे. या युतीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो आणि या युतीला दलित समाजाचा कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता असेल.