Maharashtra Politics : मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटर इथल्या जाहीर सभेतील भाषणात रविवारी (27 नोव्हेंबर) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. मग दोन दिवसांनंतर (29 नोव्हेंबर) मनसेने आगामी निवडणुकीत थेट एकला चलो रेची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. असं नेमकं काय घडलं की राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मनसे-भाजप, मनसे-शिंदे गटाच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. तरी देखील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपसोबत (BJP) छुपी युतीची शक्यता अजिबात नाकरता येत नाही. कारण मनसेची मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेली ताकदीची जाण भाजप आणि शिंदे गटाला आहे. 


छुप्या युतीची शक्यता नाकारता येत नाही
मागील मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने ठाकरे गटाच्या तब्बल 23 जागा पाडल्या होत्या. शिवाय सध्याच्या परिस्थितीत 40 ते 45 जागा अशा आहेत जिथे मनसेची ताकद मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने दादर, लालबाग, शिवडीसारख्या कोअर मराठी मतांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेसोबत शिंदे गट आणि भाजप छुपी युती साधण्याची शक्यता नाकारता येत नाही. अस गणित नाशिक, पुणे, ठाण्यातही जमू शकतं.


...म्हणून स्वबळाचा नारा?
एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एमआयजी क्लब इथे जी मनसेची बैठक पार पडली होती त्याचवेळी मनसेतील एका गटाने भाजप सोबतच्या युतीवर नकारघंटा दर्शवली होती. सोबतच भाजप आपल्याला सोयीनुसर वापरुन घेत असल्यामुळे आणि शिंदे गटासोबत युती झाल्यास आपल्यालाच मिळणाऱ्या मतांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळेच स्वबळाचा नारा देण्यात आल्याची माहिती आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार तगडी लढत देऊ शकतात त्याठिकाणी भाजप, शिंदे गट मनसेला मदत करेल तर ज्या ठिकाणी भाजप किंवा शिंदे गटाचा उमेदवार तगडी लढत देऊ शकेल त्या ठिकाणी मनसे आपली ताकद उभी करेल अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. यामुळे मनसे आपल्या मराठीच्या मुद्द्यावर देखील ठाम राहिली आहे.


सध्याच्या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचा जनतेला उबग आला असून नवा पर्याय म्हणून मनसेला जनता स्वीकारेल असा विश्वास राज ठाकरे यांना आहे. त्यामुळे स्वबळाचा निर्णय खरचं मनसेला फायदेशीर ठरणार का हे लवकरच महाराष्ट्राला आगामी महापालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या