मुंबई :  महाराष्ट्राच्या विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेतेपदाचा पेच आणि संभ्रम कायम आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या (NCP Crisis)  फुटीनंतर सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे सातत्यानं बदलतायत. त्यात विधानसभा अध्यक्ष आता अधिवेशनाआधी निर्णय घेणार का, त्यांना ते बंधन आहे का, किती लवकर राज्याला विरोधी पक्षनेता (Leader Of Opposition)  मिळणार असे सगळे प्रश्न निर्माण झालेत. 


 महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन अवघ्या दोन दिवसांवर आलंय आणि विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार याचा पेच कायम आहे. महिनाभरापूर्वी विरोधी पक्षनेते असलेले अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीनं निवडलेले जितेंद्र आव्हाड यांच्या नावावर विधानसभा अध्यक्षांचं शिक्कामोर्तब नाही. आणि तिसरीकडे काँग्रेस संख्याबळाच्या आधारावर आता आपलाच दावा करतेय. त्यामुळे राज्याचा नवा विरोधीपक्षनेता नेमका कोण हेच अजून ठरायचं आहे. 


काँग्रेसनं गटनेते पदावर दावा करण्याची शक्यता


 विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. राष्ट्रवादीत शरद पवार गटानं सुरुवातीला केवळ नऊच आमदार ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केली. पण आता राष्ट्रवादीनं आणखी 12 जणांविरोधात कारवाईची मागणी केलीय. म्हणजे एकूण 21 आमदार सोडून गेल्याचं शरद पवार यांचा गट अधिकृतपणे मान्य करतोय. या स्थितीत 44 जागा असलेला काँग्रेस पक्ष हाच विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करु शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीनं जितेंद्र आव्हाड यांची केलेली निवड ही तात्कालिकच ठरणार हे उघड.राष्ट्रवादीत कुठला गट अधिकृत, कुठला गटनेता अधिकृत यासाठीची याचिका अध्यक्षांसमोरच आहे. त्यावर ते यथावकाश निर्णय देतील. पण त्याआधी काँग्रेसनं गटनेते पदावर दावा केल्यास त्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. 


दोन दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीत


 विरोधी पक्षनेता हा विरोधी बाकावरच्या सर्व पक्षांचं प्रतिनिधित्व करत असतो. देशाच्या संसदेत एकूण संख्याबळाच्या एकदशांश तरी संख्या पूर्ण करणारे पक्ष या पदावर दावा करु शकतात अशी अट आहे. त्यात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला हे पद मिळतं. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यांनी संघटन महासचिव के सी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. 


काँग्रेसमध्ये  विरोधी पक्षनेतेपदासाठीचे काँग्रेसमधले दावेदार?


नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा आहे. 


काँग्रेस तरुण नेतृत्वाला संधी देणार?


नाना पटोले हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या बदलांची चर्चा थंडावलेली असतानाच आता या नव्या पदावर त्यांची वर्णी लागणार का हा प्रश्नच आहे. एक व्यक्ती,एक पद हा काँग्रेसच्या उदयपूर शिबिरातला नियमही आहे. संग्राम थोपटे यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असताना शेवटच्या क्षणी हुकलेलं होतं. त्यामुळे आता या संधीसाठी आपला विचार व्हावा यासाठी त्यांनी अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेता देताना ज्येष्ठांचा विचार होणार का तरुण नेतृत्वाला काँग्रेस संधी देणार हेही पाहावं लागेल. 


राज्यात सध्या कोण सत्तेत कोण विरोधात याचा मेळ लागत नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत..तर विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे...ठाकरे गटही आपणच शिवसेना असल्याचा दावा करतोय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान असताना आता विधानसभा अध्यक्ष नेमका काय निर्णय देतात हेही पाहावं लागेल. शिवसेनेतला हा घोळ बाकी असतानाच आता राष्ट्रवादीतही तोच घोळ सुरु झाल्यानं आता नवा विरोधी पक्षनेता कोण हे विधानसभा अध्यक्षांना लवकरच ठरवावं लागणार आहे.