Gulabrao Patil On Ajit Pawar : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री होते पण त्यांना प्रशासनाचा फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या काळात अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्रिपद अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असल्याने निधी मिळण्याबाबत आमदारांना अडचणी येत होत्या. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने शिंदे गटाला वाटा सारखाच मिळेल त्यात कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही याची खात्री आम्हाला आहे," असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे. अर्थ खाते अजित पवारांकडे असलं तरी आपण मुख्यमंत्री असल्याने आमदारांना काहीच अडचणी येणार नाहीत असं वक्तव्य कोल्हापूरच्या सभेत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं होतं, त्यावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.
वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने पक्षात उभी फूट पडली. उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप करत 40 हून अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले. सोबतच महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्री असताना अजित पवारांनी निधी वाटपात दुजाभाव करत आपल्या पक्षातील आमदारांना अधिकचा निधी दिल्याच्या आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. त्यामुळे अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिवसेनेचे आमदार नाराज होते. शिवाय अजित पवार यांना अर्थखातं देऊ नये, असाही शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह होता. मात्र खातेवाटपात अर्थखातं अजित पवारांकडेच आलं आहे.
रखडलेलं खातेवाटप अखेर झालं!
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एन्ट्री झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि तेरा दिवस खाते वाटपाचं घोंगडं भिजत राहिलं. महाविकास आघाडीच्या सरकारमधील शिवसेनेतल्या आमदारांचा अर्थमंत्री अजित पवार असतानाचा अनुभव वाईट होता. महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्री असताना अजित पवारांनी निधी वाटपात दुजाभाव करत आपल्या पक्षातील आमदारांना अधिकचा निधी दिल्याच्या तक्रारी शिवसेना आमदारांनी केल्या होत्या आणि त्यामुळेच अर्थ खात अजित पवारांना देण्यासंदर्भात शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. रखडलेलं खातेवाटप अखेर झालं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महत्त्वाची खाती तर शिवसेनेच्या वाट्याला कमी महत्त्वाची खाती आल्याचं या खातेवाटपात दिसत आहे.
हेही वाचा
Nitesh Rane : अजितदादा आमच्या हिंदू जनआक्रोश मोर्चात दिसतील, अयोध्येला महाआरतीही करतील : नितेश राणे