Shiv Sena Party Office : विधानभवनातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने (Shinde Group) घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. त्यानंतर आज शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की, "आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे."


एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) असे दोन गट पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले. तसेच, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. तिथून पुढे ही लढाई सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आणि तिथून या प्रकरणाला अनेक फाटे फुटले. अशातच शुक्रवारी (17 फेब्रुवारी) केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय दिला. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षातला (Maharashtra Political Crisis) उद्धन ठाकरेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.


VIDEO : Shinde Group at Shiv Sena Vidhan Sabha Office : विधीमंडळातील शिवसेना कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे



कार्यालयाचा ताबा घेण्याआधी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली का? : अरविंद सावंत


यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. त्यांचा हा उन्माद हा असाच असणार आहे. आम्ही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गेलो याची वाट पाहायला कुठे तयार असणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आम्ही याबाबत भूमिका घेणार आहे. सध्या वाद घालण्यात अर्थ नाही. परंतु कार्यालयाचा ताबा घेण्याआधी त्यांनी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेतली का? की घुसखोर म्हणून गेलेले आहेत? जर त्यांना परवानगी दिली नसेल तर त्यांनी केलेल्या घुसखोरीवर विधानसभा अध्यक्ष काय कारवाई करणार, असे सवाल खासदार अरविंद सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केले.


आम्ही कार्यालयाचा ताबा घेतला नाही, प्रवेश केला : सदा सरवणकर


"आम्ही विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतलेला नाही तर प्रवेश केला आहे. त्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया बाबी पूर्ण केल्या आहे. हे शिवसेना पक्षाचं कार्यालय आहे आणि आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही तयारी केली आहे. कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रिया भरत गोगावले यांनी पूर्ण केली आहे," अशी प्रतिक्रिया सदा सरवणकर यांनी दिली.


हेही वाचा


निवडणूक आयोगाच्या निकालानंतर चिन्ह, नाव शिंदेंकडे; आता शिवसेना भवनही ठाकरेंच्या हातून निसटणार?