Sanjay Raut News : ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिकनंतर आता ठाण्यातील नगर पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संजय राऊत यांच्याविरोधात ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांच्याविरोधात रविवारी (19 फेब्रुवारी) संध्याकाळी आंदोलन केल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरुन नाशिकच्या (Nashik News) पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (19 फेब्रुवारी) पुणे दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी आपल्या पुणे दौऱ्यात 'मोदी @ 20' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात अमित शाह यांनी यूपीए सरकार आणि उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे 'तळवे' चाटले असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं.


संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांसह भाजपवर टीका 


यालाच प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले होते. "आता सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाची चाटत आहेत. अशी चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती," अशी टीका संजय राऊत यांनी केली.


मुख्यमंत्र्यांचं संजय राऊतांना उत्तर


दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांना टीका करु दे. ते जेवढी टीक करत राहतील तेवढं मी कामाने उत्तर देईन. कोणी काहीही बोलू दे आम्ही कामाने उत्तर देऊ." मुख्यमंत्री दिल्लीत बोलत होते. 


VIDEO : Sanjay Raut Thane FIR Registered : नाशिकपाठोपाठ ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल



संबंधित बातमी