NCP Political Crisis: शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. शिवसेनेचं प्रकरण निवडणूक आयोगात गेल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. याच पद्धतीने आता अजित पवार यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगात आव्हान देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करणारं कॅव्हेट शरद पवारांकडून दाखल करण्यात आलं आहे.
आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकरणाकडे पाहता ही शिवसेना फुटीनंतरच्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं सातत्याने जाणवतं.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडील अर्जात काय म्हटलंय?
राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे, त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील अर्ज केला आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, म्हणजेच शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी केलेल्या अर्जानुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय देता येणार नाही, त्यांना निर्णय देण्याआधी शरद पवार गटाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे.
आता पुढे काय?
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे, हे प्रकरण आता निवडणूक आयोगात गेलं आहे. त्यानुसार, अजित पवारांना सदस्य संख्या किती आहे याची माहिती द्यावी लागेल.तसेच त्यांनी किती आमदार आणि खासदारांचा पाठींबा आहे आणि त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये किती मतं मिळाली आहेत याची माहिती देखील द्यावी लागणार आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठीशी
पुणे शहर राष्ट्रवादीचा मोठा गट शरद पवारांच्या पाठिशी आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीदेखील शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. कोणाचा पाठींबा कोणाला? याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांनी अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही आहे. सगळ्या नेत्यांशी चर्चा करुन भूमिका स्पष्ट करु असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा:
Ajit Pawar: खासदार, आमदार ते पाचवेळा उपमुख्यमंत्री; पाहा अजितदादांचा 41 वर्षांचा राजकीय प्रवास...