Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाळी केल्यानंतर आज एमईटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी  काही लोकांकडून अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप केला. अजित पवारांमागे राष्ट्रवादीच्या 32 आमदारांनी समर्थन दिले आहे. प्रफुल पटेल यांनी यावेळी बोलताना भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय आमदारांनी 2019 मध्येच घेतला होता, असा दावा केला. 


ते म्हणाले की, अजित पवारांमागे माझी ताकद आहे. मी हा निर्णय का घेतला? हे योग्यवेळी सांगेन. अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. शरद पवारांवर सर्वाधिक आरोप शिवसेनेनं केले आहेत, शिवसेनेला मिठी मारू शकतो, तर भाजप का नाही? असेही पटेल म्हणाले. प्रफुल पटेल या मंचावर का आणि त्या मंचावर का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, आज मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही, त्याचे उत्तर मी योग्यवेळी देणार आहे. भुजबळांनी दिलेला इशारा पुरेसा आहे. विस्तारामध्ये आम्ही नक्की चर्चा करणार आहोत. काही लोकांकडून अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचला जात आहे, पण ते चुकीचे आहे. 


पटेल पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही शरद पवार यांना विनंती केली होती. हे सर्वांना माहित आहे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे नवीन अचानक पिल्लू सोडलं आहे असं अजिबात गैरसमज करू नये. दादांनी विश्वासघात केला असता, तर दादांना पदे देण्यात का आली? दादांवर आमदारांनी विश्वास दाखवला आहे ते सन्मानाला पात्र आहेत. प्रफुल्ल पटेल सौम्य आहे म्हणून कमी बोलतो. मलाही एक दिवस पुस्तक लिहिण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे पुस्तक लिहिल्यानंतर राज्यासह देशाला कळेल, ते मला आज सांगायची गरज नाही. 


आमचाही सत्कार करा


तत्पूर्वी, छगन भुजबळ यांनीही भाजपला पाठिंबा दिल्याचे समर्थन केले. ते पुढे म्हणाले की, 2019 ला शिवसेनेसोबत गेलो, मग आता भाजपसोबत गेल्याने काय फरक पडतो. शिवसेनेबरोबर गेलो, तसेच भाजपबरोबर गेलो, यात नवीन काय? आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. तर सरकारमध्ये सामील झालो. काही दिवसांपूर्वी नागालँड मंत्रिमंडळात भाजपबरोबर राष्ट्रवादी सामील झाली, मग आम्ही काय केलं, आम्ही काय चूक केली? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. त्या लोकांचा सत्कार केला, मग आता आमचाही सत्कार करा, असे आवाहन भुजबळांनी शरद पवार यांना केले. मात्र यानंतर आता आम्ही सर्वांसाठी काम करणार असून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. ओबीसी आणि समता परिषदेचे काम करत राहणार असल्याचे भुजबळ म्हणाले. आम्ही सद्यस्थितीत अनेक नियुक्त्या करत आहोत, नव्या जोमाने काम करणार आहोत, तसेच सगळ्या समाजाला घेऊन पक्ष पुढे घेईन जाण्याचा निर्धार केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या