Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय बंड पुकारत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी 5 वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांचा राजकीय प्रवास
अजित पवार यांचं पूर्ण नाव अजित अनंतराव पवार आहे, त्यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 'देवळाली-प्रवरा' या ठिकाणी झाला. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी. कॉम. (B. Com.) ही पदवी आहे.
अजित पवारांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव येतं. राजकारणात अजित पवार यांना 'दादा' म्हणून ओळखलं जातं. खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते असा अजित पवार यांचा राजकीय प्रवास आहे.
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली. 1991 साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार 1991 साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. 1991 ते 1995 या काळात ते विधानसभा सदस्य होते.
अजित पवार नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993 या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. 1991 सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. 1999 ते 2004 या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.
1995 पासून 2019 पर्यंत सलग 7 वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. 2019 साली 1 लाख 65 हजारांपेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले. 2010 पर्यंत ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते. अजित पवारांवर 2014 साली सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले.
2019 साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलली शपथ अनेकांसाठी धक्का होता. अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण, सहकार, क्रीडा, कृषी अशा अनेक विभागांमध्ये आपली भूमिका पार पाडली आहे. मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते अशी पदं अजित पवारांनी भूषवली आहेत.
हेही वाचा: