नवी दिल्ली:  पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिपरिषदेची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीत अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे. आज दुपारी साडे चार वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. आजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर  केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीसांना यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे. तर  शेवटच्या फेरबदलात रविशंकर प्रसाद, हर्षवर्धन आणि प्रकाश जावडेकर यांना वगळण्यात आले आहे. अनुराग ठाकूर, किरेन रिजिजू आणि पुरुषोत्तम रुपाला यांना बढती देण्यात येण्याची शक्यता आहे. 


अजित पवार यांच्यासह एकूण नऊ आमदारांनी रविवारी शपथ घेतली. अजित पवार यांच्या पाठीशी असणाऱ्यांमध्ये शरद पवारांचे निष्टावान प्रफुल्ल पटेल यांचाही समावेश आहे. गृहमंत्री अमित शहा आणि  भाजपचे  अध्यक्ष जे पी नड्डा यांची बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत फेरबदलांविषयी चर्चा  झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असणारे प्रफुल्ल पटेल या बंडात  सहभागी झाले असून सूत्रांच्या माहतीनुसार प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिलं जाणार आहे. 


प्रफुल्ल पटेल आणि  फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता


पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एक मुख्यमंत्री  आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पीटीआयने भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, पंतप्रधान मोदी जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतील तेव्हा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. 20  जुलैपासून सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.


शाह आणि नड्डा यांच्यात बंद दाराआड बैठक


राज्यांसह भाजपच्या पक्षामध्ये  काही बदल  होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी 28 जून रोजी शहा आणि नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली. संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी शाह आणि नड्डा यांच्यात बंद दाराआड बैठक झाली. कारण मंत्रिमंडळातील कोणताही फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकीतही परिणामकारक ठरणार आहे. 


महाराष्ट्र,कर्नाटकातील केंद्रीय मंत्र्याच्या अडचणीत वाढ होणार?


मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या महाराष्ट्रातून आठ मंत्री आहेत. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले यांची नावे प्रमुख आहेत. महाराष्ट्रातून शिंदे गटाने तीन मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास भाजपला आपल्या कोट्यातून काही मंत्र्यांना वगळावे लागणार आहे. तर  कर्नाटकातून मोदी मंत्रिमंडळात सहा मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी ही दोन मोठी नावे आहेत. केंद्रीय मंत्री शोभा करंदळे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. 


तेलंगणातून एक आणि तामिळनाडूतून दोन मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमधील मित्रपक्ष AIADMK ला मंत्रीपद दिले जाऊ शकते. तेलंगणातून मंत्री होण्याच्या शर्यतीत सोयाम बापूराव आणि धर्मापुरी अरविंद यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे, धर्मेंद्र प्रधान यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यास त्यांना उत्तरप्रदेश भाजपचे प्रभारी बनवले जाऊ शकते. 2019 च्या निवडणुकीपूर्वी जेपी नड्डा यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले होते. त्यावेळी नड्डा यांना मंत्रिमंडळातून काढून यूपीची कमान देण्यात आली होती. 2019 च्या निवडणुकीनंतर त्यांना संघटनेत बढती मिळाली. पीयूष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. गोयल यांच्याकडे राजस्थान भाजपची धुरा सोपवली जाऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या 15 दिवसांत त्यांनी तीन वेळा राजस्थानला भेट दिली आहे. 


मंत्रीमंडळात किती मंत्र्यांना स्थान?


नियमानुसार केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांसह एकूण 81 मंत्री केले जाऊ शकतात. मंत्रिमंडळात सध्या 78 मंत्र्यांचा समावेश असून केवळ तीन पदे रिक्त आहेत. गेल्या वेळी मंत्रिमंडळ विस्तारात 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यावेळी 36 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली, तर सात मंत्र्यांना बढती देण्यात आली.