Ajit Pawar on Kolhapur NCP: ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापना करताना कोल्हापूर जिल्ह्याने (Kolhapur News) शंभर हत्तींचे बळ दिले त्याच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची दयनीय अवस्था पाहून अजित पवार चांगलेच संतप्त झाले होते. तेच अजित पवार आज समर्थक आमदारांसह भाजपच्या वळचणीला गेल्याने पक्ष आणखी रसातळाला गेला आहे. कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्यात पाच आमदार आणि दोन खासदार अशी ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीचे आज केवळ दोनच आमदार आहेत, तेसुद्धा आता बाजूला झाल्याने कोल्हापुरातील नेतृत्वहीन झाले आहेत. त्यामुळे कैफियत तरी कोणाकडे मांडायची अशी स्थिती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्येकर्त्यांची आहे. आमदार हसन मुश्रीफांची अजित पवारांवरील निष्ठा कमी अन् ईडीने छळल्याचा त्रास त्यांची झोप उडवून देणारा होता. त्यामुळे शरद पवारांची सावली सोडून ते अजित पवरांच्या कळपात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, ज्यांच्याकडे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद आहे, ते ए. वाय. पाटील यांनी उघडपणे अजित पवारांचे समर्थन केले आहे, तर त्यांचेच विरोधक असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या सर्व भानगडीत राष्ट्रवादी पक्षच जिल्ह्यात रसातळाला गेल्याची चिन्हे आहेत. 


दुसरीकडे, चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री केल्याशिवाय फटका बांधणार नाही, अशी गर्जना केली होती. आता अजित पवार उपमुख्यमंत्रीच झाल्याने साहजिक आमदार राजेश पाटलांची कळी आणि आणखी खुलली आहे यात शंका नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा मार्ग पकडला आहे. चंदगडमध्ये आता भाजपचे शिवाजी पाटील आणि राजेश पाटील काय करणार? कागलमध्ये समरजित काय करणार? राधानगरीत के. पी. पाटील काय करणार? असे प्रश्न निर्माण झाले असतानाच उर्वरित जिल्ह्यात मात्र, राष्ट्रवादी शोधायची वेळी आली आहे. मतदारसंघ सोडून राष्ट्रवादी किती वाढला? याचे उत्तर फक्त हसन मुश्रीफ देऊ शकतात.


राष्ट्रवादी अडगळीत का गेला?


राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत 1999 मध्ये कोल्हापुरात पन्हाळ्यातून विनय कोरे, करवीरमधून दिग्विजय खानविलकर, कागलमधून हसन मुश्रीफ, गडहिंग्लजमधून बाबासाहेब कुपेकर आणि चंदगडमधून नरसिंग पाटील यांनी विजय मिळवला होता. लोकसभेला कोल्हापुरातून सदाशिवराव मंडलिक आणि इचलकरंजीमधून निवेदिता माने यांनी विजय मिळवला होता. यानंतर या निकालाची पुनरावृत्ती राष्ट्रवादीला आजवर करता आलेली नाही. 


त्यामुळे एका बाजूने सतेज पाटील यांनी पदरचा खर्च करून काँग्रेसला कोल्हापुरात उर्जितावस्था दिली असताना राष्ट्रवादीची इतकी दयनीय अवस्था का झाली? याचा विचार कधीच स्थानिक नेतृत्वाने केलेला नाही. त्यामुळेच की काय अजितदादांना कागलच्या पुढे राष्ट्रवादी नेण्याचा प्रयत्न करा, असे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आपल्याच नेत्यांची झाडाझडती घेताना सांगण्याची वेळ आली होती. अजितदादांनी 10 पैकी 6 आमदार कोल्हापुरात राष्ट्रवादीचे निवडून आणा म्हणून सांगितले असले, तरी आता सगळीच समीकरणे बदलून गेली आहेत. 


हसन मुश्रीफ जिल्ह्यातील एकमेव ताकदवर नेते, पण त्यांचीच भाजपला मांडीला मांडी 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठावंतापैकी एक असलेल्या माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ हेच कोल्हापुरात राष्ट्रवादीचा चेहरा होते. जिल्ह्यात आजघडीला राष्ट्रवादीचे केवळ दोनच आमदार आहेत. यामध्ये स्वत: मुश्रीफ आणि राजेश पाटील यांचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही आमदारांची स्थानिक पातळीवर विरुद्ध दिशेला तोंडे आहेत. याचा फटका पक्षाला बसला आहे. गोकुळ आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना निवडणुकीत आमदार राजेश पाटील हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होते. दोन्ही ठिकाणी राजेश पाटील यांना आपल्याच पक्षाच्या आमदाराकडून पराभव स्वीकारावा लागला. ही स्थिती असतानाच मुश्रीफ गेल्या पाच महिन्यांपासून ईडीच्या रडारवर होते. त्यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बँकेवरही ईडीकडून तीनवेळा छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाचा चेहराच अडचणीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांनी ईडीच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अजित पवारांच्या कळपात उडी घेतली आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. 


दुसरीकडे, त्यांच्याविरोधात रान उठवणारे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांना आमदार झाल्यासारखा भास निर्माण केला होता. तथापि, त्यांच्याच तयारीवर पाणी फेरले आहे. त्यामुळे अजितदादांची ख्याती आणि देवेंद्र फडणवीसांसोबत असलेली दोस्ती पाहता मुश्रीफांचा प्रचार समरजितसिंह घाटगे यांच्या कार्यालयातून करायला लावण्यास नवल वाटू नये, अशी स्थिती आहे. 


मेव्हण्या पावण्यांच्या वादाने पक्ष जर्जर 


दोन विद्यमान आमदारांची नुरा कुस्ती सुरु होती तेव्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि त्यांचे नात्याने मेहुणे असलेले माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातील वादही सर्वश्रुत आहे. या वादाचा उल्लेख अजितदादांनी कोल्हापूर दौऱ्यात केला होता. मेव्हण्या पावण्यांच्या राजकीय वादा भुदरगड राधानगरी मतदारसंघातून आमदार प्रकाश आबिटकरांनी दोनवेळा बाजी मारली हे सांगण्यासाठी राजकीय विश्लेषकांची गरज नाही. ए. वाय. पाटील  शिंदे गटाच्या व्यासपीठावरही दिसून आले होते.  


कोल्हापूर शहरामध्येही तीच स्थिती  


हा वाद सुरु असतानाच कोल्हापुरातही पदाधिकाऱ्यांचा वाद उफाळून आला होता. डिसेंबर महिन्यात सीमाभागातील कर्नाटक सरकारच्या दंडेलशाहीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित  करण्यात आली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यात वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकेरी उल्लेख करण्यापर्यंत हा वाद वाढत गेला. सर्किट हाऊस परिसरात हा वाद झाला होता. शेवटी आदिल फरास यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना बाजूला करून वादावर पडदा टाकला होता. 


लोकसभेला काय चित्र असेल?


आगामी लोकसभेसाठी कोल्हापुरातून परिस्थिती पुन्हा बदलली आहे. आता मंडलिक-महाडिक आणि आता हसन मुश्रीफ एकत्र आल्याने आता पुन्हा एकदा नव्याने समीकरण होणार आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून लढलेल्या धनंजय महाडिक यांनी भाजपत प्रवेश केला आहे. शिवसेना भाजप युतीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत. आता राष्ट्रवादीच भाजपसोबत गेल्याने कोल्हापूरचा तिढा आणखी वाढला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या :