Ambadas Danve On BJP  Government: अकोला आणि अहमदनगरच्या शेवगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापताना पाहायला मिळत आहे. तर यावरूनच आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यातील हिंसाचाराच्या घटनेला राज्य सरकारला दोषी ठरवत टीका केली आहे. राज्यात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांकडून घडवून आणल्या जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. 


याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्यात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना घडवण्यामागे राज्यातील सत्ताधाऱ्यांच्याचं तर हात नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. काही भाजपचे लोकं म्हणाले होते की, छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर कुठेच काहीही झालं नाही. मग अकोल्यात काय झालं, गोळीबारात कोणाचा मृत्यू झाला आहे. याचा तपास केला पाहिजे, हिंसाचाराच्या घटनेचा तपास केला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रात जाणीवपूर्वक हिंसाचाराच्या घटना घडवण्याचे पाप आत्ताचं सरकार करत आहे. संभाजीनगरच्या घटनेनंतर देखील राज्याच्या गृह विभागाला अजूनही शहाणपण सुचलेलं नसल्याच दानवे म्हणाले आहे. 


 भाजपची सत्ता असताना राज्यात हिंसाचाराच्या घटना


जे काही संभाजीनगर जिल्ह्यात घडलं तेच अकोल्यात घडलं आहे. संभाजीनगरप्रमाणे अकोल्यात देखील पोलीस घटनास्थळी दीड-दोन तास उशिरा पोहचली. बेसावध जमावावर हल्ला करण्यात आला. यावेळी करण्यात आलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. शेगावला देखील काय झाले याचा तपास केला पाहिजे. जाणीवपूर्वक सत्तधारी पक्ष हे सर्वकाही घडवत आहे. काही दिवसांपूर्वी बिहार आणि इतर भागात असेच काही घडलं आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आली नाही तर देशात हिंसाचारच्या घटना घडतील. भाजपची सत्ता असताना राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे आता लोकांनी समजून घेतलं पाहिजे. 


येणाऱ्या काळात देखील हिंसाचाराच्या घटना घडतील...


मुद्दाम समाजात फुट पाडणे, जातीमध्ये फुट पाडणे सुरु आहे. कारण सरकार जनतेच्या प्रश्नावर विरोधकांना, जनतेला उत्तर देऊ शकत नाही. जनतेच्या प्रश्नाला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे अशावेळी मूळ प्रश्नापासून दूर जाण्यासाठी हिंसाचार घडवला जात आहे. तसेच येणाऱ्या काळात देखील अशा घटना सरकराकडून घडवण्याची दाट शक्यता असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chandrakant Khaire : राज्यातील हिंसाचाराच्या घटना म्हणजे, भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप