Beed News: 20 मे रोजी ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात होत आहे. मात्र सभेच्या आधीच ठाकरे गटात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना आपण मारहाण केल्याचा दावा त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान या सर्व आरोपांना सुषमा अंधारे यांनी उत्तर देत, फेटाळून लावले आहेत. नऊ महिन्यात प्रत्येक वेळी हा शेवटचा आघात असं वाटतं. कथित मारहाण प्रकरण ते विभक्त झालेल्या पती संदर्भात सुषमा अंधारे यांनी आज स्पष्टच भूमिका मांडली. तर सगळीकडून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणत सुषमा अंधारेंच्या डोळ्यात अश्रू आले. 


'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, सुषमा अंधारे यांनी आप्पासाहेब जाधव यांनी जे आरोप केलेत ते सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मुळात आप्पासाहेब जाधव हा वाळू माफिया असून, वाळू माफिया कसे असतात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण प्रत्यक्षात मारहाणीचा कोणताही प्रकार घडला नाही. उलट अप्पासाहेब जाधव यांची गणेश वरेकर यांच्यासोबत बाचाबाची झाली असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितले.


सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू 


पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, हा सगळा शिंदे गटाचा कट असून, मागच्या अनेक दिवसांपासून आप्पासाहेब जाधव शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांनी ठरवून महाप्रबोधन यात्रा डिस्टर्ब करण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला. तर काल स्वतः आप्पासाहेब जाधव हे ठरवून तिथे आले होते, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांनी परळी शहरामध्ये शिवसेनेचे कार्यालय सुरु केले असून, या कार्यालयासाठीच लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी कार्यकर्त्यांवर मोठा दबाव होता असा आरोप आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. याच आरोपाला उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी या कार्यालयातील प्रत्येक वस्तू कोणी दिली आहे हे सांगितले. हे सांगत असताना सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले. 


जाधव यांची हकालपट्टी...


बीड जिल्ह्यातील ठाकरे गटातील या सर्व घडामोडीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून एक आदेश काढण्यात आला आहे. ज्यात बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा; जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी