Jalgaon News : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे (Heatstroke) 14 जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. दरम्यान आज जळगावच्या (Jalgaon) पाचोऱ्यात ठाकरे गटाची भव्य अशी सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र दुपारपासूनच कार्यकर्त्यांची येण्याची शक्यता लक्षात घेता, ठाकरे गटाकडून सभेपासून 2 किलोमीटर परिसरात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. खारघर प्रकरणानंतर खबरदारी म्हणून ठाकरे गटाकडून सभेसाठी येणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. 


उद्धव ठाकरेंची ज्या पाचोऱ्यामध्ये सभा होणार आहे, तिथे कडाक्याचे ऊन पडले आले. गेल्या काही दिवसांपासून जळगावचा पारा 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे पार गेला आहे. तर दुपारपासूनच सभेला कार्यकर्ते येऊन पोहोचणार असल्याने, त्यांच्यासाठी सभेच्या मार्गावर जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत 24 पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाकडून या पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. सोबतच वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी आयोजकांकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 


जळगावात पारा 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे


राज्यात सद्या सर्वत्र उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यातच जळगाव जिल्ह्यात देखील उन्हाचा पारा वाढतोय. त्यामुळे जीव लाहीलाही करतोय. डोक्यावर प्रचंड ऊन असल्याने घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे. तर दुपारच्या सुमारास गरज नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नयेत असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. तर शनिवारी देखील जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेले होते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने देखील खबरदारी घेत सभेच्या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी उन्हापासून बचाव करण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या आहेत. तर ठिकठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आली आहे. 


उन्हामुळे कार्यकर्ते उशिरा येण्याची शक्यता...


जळगाव जिल्ह्यात उन्हाचा चटका जाणवत असल्याने, सभेला होणारी गर्दी संध्याकाळनंतरच होण्याची शक्यता आहे. प्रचंड ऊन असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी संध्याकाळीच घराबाहेर पडणं पसंद केले आहे. सद्या सभेच्या ठिकाणी हवी अशी गर्दी झालेली दिसत नाही. परंतु संध्याकाळी चार ते पाच वाजेनंतर सभेसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 


खारघर प्रकरणानंतर खबरदारी! 


खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये रविवारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणाऱ्या लाखो अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. परंतु सकाळी 10 वाजताचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत लांबला होता. त्यामुळे इतके तास श्रीसेवकांना रणरणत्या उन्हातच बसून राहावे लागले होते. तर अनेक तास पाणी न मिळाल्याने आणि वरुन उन्हाच्या झळांमुळे अनेक श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो उष्माघातामुळे अस्त्यवस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ठाकरे गटाच्या सभेत वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करुन देण्यात आली आहे. तसेच शिवसैनिक स्वतः सभेचं सर्व नियोजन करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जळगावात कोरोना काळात 400 कोटींचा घोटाळा; सभेपूर्वीच संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर गंभीर आरोप