Sanjay Raut  On Gulabrao Patil : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगावाच्या पाचोऱ्यात सभा होत आहे. दरम्यान या सभेपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल 400 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. तर या घोटाळ्याचे सर्व कागदपत्र आपल्याकडे असल्याचं देखील राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपाने खळबळ उडाली असून, यावर गुलाबराव पाटील यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


काय म्हणाले संजय राऊत? 


दरम्यान यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "माझ्याकडे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र आहेत. कोरोना काळात पालकमंत्री म्हणून आणि जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून गुलाबराव पाटील यांनी चढ्या भावाने बेफाम खरेदी केली. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध यांचा समावेश आहे. 2 लाख रुपयांच्या व्हेंटिलेटरची खरेदी 15 लाखात करण्यात आली. आपल्या जिल्ह्यातील रुग्णांचे जीव वाचवण्यापेक्षा गुलाबराव पाटील हे प्रत्येकावर दबाव आणून खरेदी करुन घेत होते." 


गुलाबराव पाटील यांचे प्रकरण फडणवीसांकडे पाठवणार


दरम्यान याचवेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. "मी गृहमंत्री झाल्याने काही लोकांच्या अडचणी वाढल्या असल्याचं फडणवीस म्हणत असतील तर त्यांचा हा गैरसमज आहे. कारण फडणवीस गृहमंत्री झाल्याने भ्रष्टाचारी, लफंगे, लुटमारी करणारे खुश झाले आहेत. आपला बाप आला असं त्यांना वाटतंय. राहुल कुल यांच्या 500 कोटीचे प्रकरण पुराव्यासकट आणि ऑडिट रिपोर्टसह मी त्यांच्याकडे पाठवले. शेतकऱ्यांचे पैसे कसे लुटले याबाबत पुरावे दिले. पण गृहमंत्र्यांनी काय केलं, त्यांना कोण घाबरत आहे. तर फडणवीस यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात आहे. तसेच शिंदे गटाचे दादा भुसे यांनी तेरणा सहकारी साखर कारखान्यात 1800 कोटीचा भ्रष्टाचार केला. काय झालं त्या पैशांचं. त्यावर देखील फडणवीस यांनी काय केले. आता गुलाबराव पाटील यांचे प्रकरण पाठवत आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं. 


किरीट सोमय्यांवर टीका 


गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही अनेक प्रकरण पाठवले. त्याचे पुरावे देखील दिले. सोबतच भाजप नेते किरीट सोमय्यांकडे देखील हे प्रकरण पाठवले. महाविकास आघाडीच्या काळात तुरुंगात घालणार असे म्हणणारे सोमय्या आता यांना कधी तुरुंगात पाठवणार आहे. हे पण घोटाळे आहे, तीर्थयात्रा थोडी आहे. भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. तुमच्या लोकांनी केला म्हणजे शिष्टाचार आणि दुसऱ्यांवर केलेले आरोप म्हणजे भ्रष्टाचार असे होत नाहीम अशी टीका राऊत यांनी सोमय्यांवर केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sanjay Raut : सरकारचं 'डेथ वॉरंट' निघालं, पंधरा दिवसात सरकार कोसळणारच; संजय राऊतांचं मोठ वक्तव्य