मुंबई : मान्सूनची (Monsoon) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Arrival Update) तारीख समोर आली आहे. उन्हाच्या कडाक्या हैराण झालेल्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सून यंदा काही  दिवस लवकर केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरीस नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनाच्या बातमीमुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून केरळात 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली


मागील वर्षी 4 जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र, यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.


ला निनोमुळे चांगल्या पावसाची शक्यता


यंदा मान्सून सामान्य तसेच सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये कमकुवत मान्सून पाहायला मिळाला होता मात्र, यंदा मान्सून समाधानकारक आणि चांगला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जगभरातील हवामानावर परिणाम करणारा एल निनो कमजोर होऊ लागला आहे. ला निनोची परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत ला निना परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


यंदा मान्सून 106 टक्के पडणार


यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने या आधीच वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, यंदा भारतात सरासरीच्या 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.  हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी 15 एप्रिल रोजी मान्सूनचा अंदाज वर्तवत ही माहिती दिली होती. भारतीय हवामान विभागाने हा पहिला अंदाज वर्तवला होता. आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे.  यंदा मान्सून (Monsoon 2024) सामान्यपेक्षा अधिक बरसणार असल्याचं हवामान  विभागाचं म्हणणं आहे. यंदा महाराष्ट्रातही (Maharashtra Monsoon Update) मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.