Maharashtra Politics: मी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यापेक्षाही मोठा आमदार, ते मोठ्या खात्याचे मंत्री मला काय घेणं देणं? गिरीश भाऊंना नेहमी मोठमोठी खाती भेटतात, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना मिश्किल टीप्पणी केली आहे. जळगावातील मातोश्री वृद्धाश्रमात मंत्री गुलाबराव पाटील आणि  मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन यांना उद्देशून आपल्या विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं.


मंत्री गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले की, "गिरीशभाऊंपेक्षा फार मोठा आमदार आहे मी. ते मोठ्या खात्याचे मंत्री असतील मला काही घेणं देणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती भेटतात, पण भाऊ मी ज्या मतदारसंघात राहतो. त्या मतदार संघात कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आहे, या ठिकाणी जैन उद्योग समुहाच्या दोन कंपन्या आहेत, आणि केशव स्मृती प्रतिष्ठान सुद्धा याच मतदार संघात आहे, त्यामुळेच मी स्वतःला खूप मोठा आमदार समजतो." मंत्री गुलाबराव पाटलांनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हास्याचे फवारे उडाल्याचं पाहायला मिळालं.


इर्शाळवाडीची दुर्घटना घडली, त्यावेळी हे बहादर वरती होतं टेकडीवर : मंत्री गुलाबराव पाटील 


"काही दिवसांपूर्वी इर्शाळवाडीची दुर्घटना घडली. सकाळी मिटींग सुरू झाल्या, तर हे बहादर वरती होतं टेकडीवर, म्हणजे, सगळेजण विरोध करत असताना आमचे गिरीशभाऊ वरती टेकडीवर होते. यांच्यामागे आमचाही सहारा होऊन जातो. सगळे म्हणतात गिरीशभाऊ जळगावते मीसुद्धा सांगतो, मीपण जळगावचा आहे.", असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांवर स्तुतीसुमनंही उधळली आहेत. 


गिरीशभाऊंनी शेअर्स घेतले मला माहीतीय : मंत्री गुलाबराव पाटील 


"गिरीशभाऊ म्हणाले ते अगदी बरोबर आहे. बरेच लोक साखरेच्या पोत्यावर बसतात पण त्यांना साखर खाता येत नाही. म्हणून खेड्यापाड्यात एक अशी म्हण आहे की, पाणी वाहतं ठेवलं पाहिजे, पाणी वाहतं ठेवलं की, डेंग्यू होत नाही, डास होत नाही आणि नवं पाणी येत राहतं. मग असे लोक तेच करतात पाणी वाहंतं ठेवतात. एक काळ असा होता की, गेली गेली कंपनी संपली, कंपनीचा सत्यानाश झाला, असाही काळ कंपनीनं अनुभवला. पण जिथे नितीमत्ता आणि परमेश्वराची साथ असते, तिथे सगळ्या गोष्टी भक्कम होतात. आज आपण पाहतोय, शेअर बाजाराचा आकडा मी काही खेळ नाही. पण, जैनचा आकडा विचारत राहतो. त्यामुळे ज्या कंपनीला डुबली असं म्हणत होते. आज त्याच लोकांनी कंपनीला वर आणलंय." तसेच, पुढे बोलताना, गिरीशभाऊंनी शेअर्स घेतले मला माहीत आहे. यांची नावं आहे माझ्याकडे, बाकीच्यात काय नावं आहेत मी बोलणार नाही, पण शेअरच्या बाबतीत माहीत आहे. कारण मीसुद्धा भाऊंपाशी बसतो ना, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 


पाहा व्हिडीओ : Gulabrao Patil On Girish Mahajan : मी गिरीश भाऊपेक्षा मोठा आमदार,गिरीश भाऊंना मोठी खाती मिळतात