Maharashtra Loksabha Election : मुंबईमधील सहा जागांसाह ठाणे, कल्याण आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर अखेरच्या टप्प्यातील मतदान आज (20 मे) होत आहे. महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं असून आज अखेरचा पाचवा टप्पा आज होत आहे. धुळ्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुद्धाचा थेट सामना रंगला आहे. भाजपकडून डाॅ. सुभाष भामरे रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव आहेत.
महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा मिळतील
दरम्यान, धुळे शहरातील गरुड प्रायमरी स्कूल या ठिकाणी एमआयएमचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, यंदा जनता जागृत झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 25 ते 30 जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. डॉ. फारुक यांनी बोलताना सांगितले की, नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने मतदान करून बदल घडवायचा आहे. दुसरीकडे, धुळे लोकसभा मतदारसंघासाठी सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून विविध मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, भाजपकडून सुभाष भामरे धुळ्यात तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. वंचितचा उमेदवार नसल्याने धुळे मतदारसंघात मतविभाजन होणार नाही, त्यामुळे याचा लाभ कोणाला होणार? याचीही चर्चा आहे. भामरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या आणि धुळ्याच्या माजी पालकमंत्री शोभा बच्छाव या रिंगणात आहेत. मुस्लीमबहुल धुळे, मालेगाव, दोंडाईचा, सोनगीर, नरडाणा याठिकाणी मुस्लिम, दलित, आदिवासी यांची मते काँग्रेससाठी जमेची बाजू असणार आहेत. काँग्रेस ही मते आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झाल्यास भामरे यांना आव्हान निर्माण होऊ शकते.
इतर महत्वाच्या बातम्या