मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीने मुसंडी मारत 29 जागांवर कब्जा मिळवला आहे, तर दुसरीकडे 45 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करणाऱ्या महायुतीचे घोडे मात्र 18 जागांवर थांबल्याचं दिसून आलं. राज्यातील काही ठिकाणी लाखांचे लीड घेऊन उमेदवार निवडून आले तर काही ठिकाणी अटीतटीची लढत दिसली. राज्यातील काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून काही दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार आणि कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 


राज्यातील दहा दिग्गजांना पराभवाचा धक्का


बीड- पंकजा मुंडे


राज्यातील सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीडमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा पराभव केला.


जालना- रावसाहेब दानवे


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा जालन्याचा गड यंदाच्या निवडणुकीत ढासळल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा 1,11,851 मतांनी पराभव केला. हा निकाल भाजपसाठी धक्कादायक निकाल आहे. 


कपिल पाटील - भिवंडी 


राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भिवंडीतील उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा 66 हजार मतांनी पराभव करून भाजपला चांगलाच धक्का दिला. 


दिंडोरी - भारती पवार


दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना मोठा धक्का बसला असून या ठिकाणाहून शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंचा एक लाखांहून अधिक मतांनी विजय झाला. 


मुंबई उत्तर मध्य- उज्ज्वल निकम


राज्यातील एक लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. सुरुवातीला उज्ज्वल निकम यांचे जवळपास 52 हजार मतांचं लीड वर्षा गायकवाड यांनी भेदलं आणि विजय मिळवला.


चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार 


काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या जायंट किलर ठरले असून त्यांनी राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. 


बारामती - सुनेत्रा पवार


संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुप्रिया सुळे यांनी जवळपास एक लाखाहून जास्त मतांनी निवडून आले.


अमरावती - नवनीत राणा 


राज्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. 


धुळे- सुभाष भामरे


केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी त्यांचा पराभव केला. 


पुणे- रवींद्र धंगेकर


पुण्याच्या मोठ्या लढतीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. 


ही बातमी वाचा: