पुणे : राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये (Baramati Lok Sabha Election Result 2024) शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या नणंद आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होमग्राउंड कुणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय. गेल्या निवडणुकीत मुलगा पार्थ पवारचा पराभव आणि आता पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव अजित पवारांना पाहायला लागला. त्यामुळे अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका पडल्याचं चित्र आहे. 


आधी मुलाचा पराभव


गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. पार्थ पवारांच्या नावाला खुद्द शरद पवारांचा विरोध होता असं सांगितलं जात होतं. त्याही परिस्थितीत अजित पवारांनी पार्थ पवारांना तिकीट दिली. पण शिवसेनेच्या संजय बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. तो पराभव अजित पवारांच्या वर्मी लागल्याची चर्चा होती.


राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची शरद पवारांवर टीका


गेल्यावेळी राष्ट्रवादी पक्ष एकसंघ होता. पण यंदा परिस्थिती वेगळी होती. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांपेक्षा भूमिका वेगळी घेतली आणि भाजपसोबत सत्तेत गेले. अजित पवार नुकतात सत्तेत गेले नाहीत तर शरद पवारांनी उभा केलेला पक्ष आणि चिन्ह स्वतःकडे घेतले. 


एवढंच नाही तर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीत सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. संपूर्ण पवार कुटुंबीयांचा विरोध असला तरी त्याला न जुमानता अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात वक्तव्यं सुरूच ठेवली. 


अजित पवारांच्या भूमिकेवर बारामतीकर नाराज


सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी जंग-जंग पछाडलं. जे जे नेते सुप्रिया सुळेंच्या प्रचारात होते, त्यांना कोणत्याही मार्गाने आपल्याकडे वळवलं. त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मदत करताना कोणतीही कसर सोडली नाही. आतापर्यंत बारामतीमध्ये जी काही विकासकामं केली आहेत ती आपणच केली असल्याचा दावा अजित पवारांनी केला. 


नेमकं हीच गोष्ट बारामतीकरांना आवडली नसल्याचं आता निकालानंतर स्पष्ट होतंय. बारामतीमधील निवडणूक ही अतितटीची होणार असल्याचं चित्र असतानाही निकालानंतर मात्र तसं काही झालं नसल्याचं दिसून आलं. सुप्रिया सुळे यांनी लाखाहून जास्त लीड घेतलं. 


बारामतीमध्ये शरद पवारच बॉस


ज्या शरद पवारांनी पक्ष स्थापन केला त्यांनाच न जुमानता, त्यांच्याच विरोधात भूमिका घेऊन स्वतःच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची अजित पवारांची भूमिका बारामतीकरांना पसंत पडली नसल्याचं दिसून आलं. त्यामुळेच बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पदरात भरभरून मतदान केल्याचं दिसून आलं.


आपल्या राजकारणाची सुरूवात बारामतीमध्ये झाली असून गेल्या 60 वर्षांच्या काळात बारामतीकरांनी आपल्याला भरभरून दिल्याचं शरद पवारांनी या आधीही सांगितलंय. आता सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्यामुळे शरद पवारांनी ही निवडणूक हलक्यात घेतली नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळेच आधी मुलाचा पराभव आणि आता पत्नीचा पराभव पाहायला लागलेल्या अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिकाच पडल्याचं दिसतंय. 


ही बातमी वाचा :