Atul Londhe on MNS Toll Protest : सरकारनं (Maharashtra Government) निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात, कोणाच्या घरी नाही, असं म्हणत टोल मुद्द्यावरून (Maharashtra Toll) काँग्रेसकडून सरकारवर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. तसेच, टोलनाक्यांवर (Mumbai Thane Toll Issue) सरकारच्या कॅमेऱ्यासोबत मनसेचे (MNS) कॅमेरे कशासाठी असा सवालही काँग्रेसनं (Congress) उपस्थित केला आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) राज ठाकरेंच्या निवासस्थानी टोल मुद्द्यावरुन बैठक झाली, त्या बैठकीसाठी मंत्री दादा भुसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जातं म्हणजे हे समांतर सरकार चालवल्यासारखं आहे. विरोधी पक्षानं जनतेचा एखादा मुद्दा सरकारकडे मांडला, तर त्यावर सरकारनं कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायचा असतो, कोणाच्या घरी मंत्री आणि अधिकारी पाठवून नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. आम्ही भ्रष्टाचारी आहोत हे सरकारनंच मान्य केलं आहे. तसेच, टोल नाक्यांवर सरकारी कॅमेऱ्यांबरोबरच मनसेचे कॅमेरेही लावले जाणार आहेत, हे घटनाबाह्य आहे. सरकारच्या कॅमेऱ्यांबरोबर मनसेचे कॅमेरे कशासाठी? असा सवालही यावेळी अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
प्रत्येक टोलनाक्यावर 200 ते 300 मीटरपर्यंत पिवळ्या रेषेवर रांग गेली, तर त्यापुढच्या सगळ्या गाड्या टोल न घेता सोडून दिल्या जातील. 4 मिनिटांच्या पुढे टोलनाक्यावर एकही गाडी थांबणार नाही. त्यासाठी तिथे काही पोलीसही थांबतील, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. त्याचप्रमाणे, "मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर उद्यापासूनच कॅमेरे लावले जातील. 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्सवर सरकार आणि आमच्या पक्षाच्या कॅमेऱ्यांनी लक्ष ठेवलं जाईल, किती गाड्या टोलवरुन जातात, हे कळण्यासाठी ही व्हिडीओग्राफी केली जाणार आहे." तसेच, काल (गुरुवारी) बैठकीत ठरलेल्या गोष्टी लेखी स्वरुपात आलेल्या नव्हत्या, तिथे असं ठरलं की, आज एक बैठक घेऊन त्या लेखी स्वरुपात तुमच्यासमोर गोष्टी आणाव्यात, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या घरी आज मुंबई आणि महाराष्ट्रातील टोलच्या मुद्द्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुरुवारी 12 ऑक्टोबरला झालेल्या बैठकीनंतर, आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर (Shivteerth) बैठकीचं नियोजन होतं. त्याप्रमाणे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह प्रशासकीय अधिकारी सकाळी सकाळी 8 वाजता राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले. यानंतर राज ठाकरेंसोबत टोलबाबत चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली.