जालना : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आज आंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सभा होत आहे. दरम्यान या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली गावात येणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सोबतच सर्वच प्रमुख रस्त्यावर देखील मोठी वाहतूक कोंडी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या सभेच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सर्वच शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याबाबत आदेश काढला आहे. 


आंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सभा होत असून, यासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आंतरवाली येथील होणारी गर्दी लक्षात घेता, अंबड तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शाळेत येण्या-जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नयेत व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नयेत यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे. तर, जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना शाळे बंद ठेवण्याचे आदेश काढले असून, हे पत्र अंबड पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. 


काय म्हटले आहे आदेशात? 


14  ऑक्टोबर, 2023 रोजी मराठा समाजाची विराट सभा अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे आयोजित केली असुन, सभेच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहे. त्यामुळे, अंबड तालुक्यांतर्गत शाळेमध्ये जाणे येणे करिता विदयार्थ्याना त्रास होऊ नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सुटी देण्यात यावी. अंबड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ सुचना देऊन तसा अहवाल जिल्हा परिषद कार्यालयास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.


सभेच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त


सभास्थळी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस अधीक्षकांसह तीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, 6 डीवायएसपी, 21 पोलि निरीक्षक, 57 सहायक पोलिस निरीक्षक व फौजदार, 1000 पोलिस अंमलदार, 200 वाहतूक शाखेचे कर्मचारी, एसआरपीएफची एक तुकडी, बीडीडीएस चे चार पथके कार्यरत राहणार आहेत. शिवाय चार ड्रोनद्वारे सभास्थळाच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे.


अनेक ठिकाणी पार्किंग व्यवस्था...


आंतरवाली सराटी गावात आज होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात येत होती. तसेच राज्यभरातील येणाऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगची देखील विशेष सोय करण्यात आली आहे. ज्यात, वडीगोद्री बाजार समितीच्या आवारातील 62 एकर, दोदडगाव येथे 6 एकर, सभास्थळाजवळ 6 एकर, रामगव्हाण येथे 6 एकर, गरजेनुसार समर्थ कारखाना अंकुशनगर, वडीगोद्री महामार्गावरील धाकलगाव शिवारात वाहनांची पार्किंग केली जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आंतरवाली सराटीत आज इतिहास घडणार, या मुद्द्यांवर असणार मनोज जरांगे पाटील यांचे भाषण?