Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पाच टप्प्यातील निवडणुकांपैकी राज्यात दोन टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाप्रती असलेली उदासीनता आणि उष्णतेची लाट इत्यादी अनेक कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. असे असताना या निवडणुकांना घेऊन सट्टाबाजारात (Betting Market) देखील मोठी उलाढाल होतानाचे चित्र आहे. सध्या तरी देशात भाजपचीच (BJP) सत्ता येईल, असे सट्टाबाजाराला वाटतंय. तर प्रत्येक मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील लढतीनुसार सध्या बाजारभाव ठरवला जातोय.      


भाजप 300 ते 303 पर्यंत, तर काँग्रेस 57 ते 59 जिंकेल?


सध्या तरी देशात भाजपचीच सत्ता येईल, असे सट्टाबाजाराला वाटत आहे. मात्र, सट्टा बाजारानुसार दोन टप्प्याच्या मतदानानंतर भाजपच्या विजयी जागांचा आकडा 314 ते 317 वरून 300 ते 303 पर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मतदानाच्या पुढील टप्प्यात हा आकडा वर-खाली जाण्याची पण शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला निवडणुकीच्या 43 ते 45 जागा मिळेल, असा सट्टाबाजाराचा अंदाज होता. मात्र दोन टप्प्याच्या मतदानानंतर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून आजच्या तारखेत काँग्रेस 57 ते 59 जिंकत असल्याचे सट्टा बाजाराला वाटत आहे.


नागपुरात नितीन गडकरींचे पारड जड 


राज्यातील पहिली दोन टप्प्याचा विचार करायचं झाल्यास सर्वाधिक कमी भाव नागपूर लोकसभेत नितीन गडकरी यांचा आहे. नितीन गडकरी यांच्यावर 1 लाख लावले तर 3 हजार भेटेल तर काँग्रेस विकास ठाकरे यांच्यावर 8 हजार लावले तर जिंकल्यानंतर 1 लाख  मिळणार आहे. एकुणात सट्टाबाजारात देखील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांचेच पारड जड असल्याचे बघायला मिळत आहे. सट्टाबाजारानुसार चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसचे पारडे जड आहे. या ठिकाणी भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार रिंगणात असून त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने प्रतिभा धानोरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर राज्यात बऱ्याच चर्चेत असलेले अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपसाठी सारखाच 90 रुपये दर आहे.


प्रतीक्षा अंतिम निकालाची 


सध्याघडीला पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानानंतर सट्टाबाजाराचा हा अंदाज असला तरी आगामी काळात राजकीय गणिती बदलली तर सट्टाबाजाराचा कलही बदलणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाप्रमाणेच आता सट्टाबाजारात देखील या निवडणुकांचे वारे वाहत असून साऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती या मतदानाच्या अंतिम निकालाची. मतदार राजानं नेमकं कोणाच्या पारड्यात आपला कौल दिलाय, हे आता 4 जूनलाच कळू शकणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या