Maharashtra Politics मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तर अखेर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 31वे मुख्यमंत्री ठरले असून त्यांनी केलेल्या 'मी पुन्हा येईन'ची प्रतिज्ञा खरी ठरली असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, अनेक अडथळ्यांची मालिका आणि नाराजीनाट्य रंगल्या नंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटला असताना इतर अनेक घडामोडींना आता वेग आला आहे. अशातच वर्षा निवासस्थानी लावलेल्या नावाच्या पाटीवरून "मुख्यमंत्री" शब्द झाकला गेला आहे.
नेमकं कारण काय?
वर्षा निवासस्थानी लावण्यात आलेल्या एकनाथ संभाजी शिंदे यांचे नाव तसेच ठेवत त्याखालील "मुख्यमंत्री" या पदावर कागद चिकटवण्यात आला आहे. काल जरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असली तरीही अजून वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना नंदनवन या शासकिय निवासस्थानी राहणार आहेत. वर्षावरील काही सामान नंदनवन बंगल्यात नेण्यात आलेले आहे. मात्र, तिथे देखील काही काम सुरू असल्याने सध्या एकमेव शिंदे हे वर्षा निवासस्थानावर वास्तव्यास आहेत.
देवगिरी, रामगिरी या नागपुरातील बंगल्याचीही अदलाबदल
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता बदल झाला नसला, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे. नागपूरातील रामगिरी म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या आणि देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या प्रवेशदारावर हे सत्ता केंद्र बदलाचे दृश्य प्रकर्षाने जाणवत आहे. रामगिरी बंगल्याचे प्रवेशद्वारावर कालपर्यंत असलेली एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची पाटी काढून नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. तर देवगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis CM) यांच्या नावाऐवजी आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदल झाले नसले, तरी सत्ता केंद्र बदल नक्कीच झाले आहे आणि तेच नागपुरात रामगिरी आणि देवगिरी या दोन शासकीय बंगल्यांच्या प्रवेशद्वारावर दिसून येत आहे.
गृहखात्यावर फडणवीसांनी काय म्हटलं
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी गृहखात्यावर स्पष्टपणे भाष्य केलं. गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे, गृहखात्याचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, दिल्लीतील केंद्रीय गृहखात्याचा व राज्यातील गृहखात्याचा समन्वय चांगला होण्यासाठी ते खातं आमच्याकडेच असेल तर चांगलं असेही फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
हे ही वाचा