मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आणि आमदारांनी शपथग्रहण केल्यानंतर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. त्यानुसार, येत्या 14 तारखेला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांनी यापूर्वीच हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Vidhansabha Winter Session 2024) आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले होते. त्यानुसार आता 14 डिसेंबरला महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल. मुंबईतील वर्षा बंगल्यावर रविवारी रात्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाच्या चर्चेचा वेग आला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अंतिम होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी बैठक करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रविवारी रात्री 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेच्या जागांबाबत चर्चा केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चांगली खाती मिळवण्यासाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपने त्याला नकार दिला होता. मात्र, शिवसेनेने गृहमंत्रिपदाची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे शिवसेनेला गृहमंत्रीपद मिळणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. भाजपकडून गृहखात्याऐवजी महसूल खाते शिवसेनेसाठी सोडले जाईल, अशीही चर्चा आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड मागवून घेतले होते. त्याआधारे शिवसेनेच्या 5 आमदारांचे मंत्रिपद नक्की मानले जात आहे. तर संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनात नवे मंत्रिमंडळ विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देईल. (Maharashtra Governmen Cabinet Expansion will take place soon)
आणखी वाचा
गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही