सांगली : मुख्यमंत्रिपदापासून गृहमंत्रिपदापर्यंतची पदे असलेल्या सांगली जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra Cabinet Expansion) मात्र एकही मंत्री पद मिळालेले नाही. सांगली जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार असतानाही एकही मंत्रीपद जिल्ह्याला न मिळाल्याने सांगलीकरांच्या पदरी निराशा पडली आहे. मात्र हे मंत्रीपद पालकमंत्री पदाच्या वादावरून भेटले नाही की जिल्ह्यातील मोठा नेता महायुतीत येण्याच्या शक्यतेमुळे जिल्ह्यात आता मंत्रीपद दिलं गेलं नाही याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. 


जिल्ह्याला सध्या तरी आयात पालकमंत्री भेटण्याची शक्यता आहे. सांगलीतून कधीकाळी डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील असे दिग्गज नेते मंत्रिपदी असायचे. 2014 नंतर आता सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एकही मंत्रिपद आले नाही. 2005 ते 2009 या काळात सांगली जिल्ह्यात  डॉ. पतंगराव कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील, मदन पाटील हे चार मंत्री होते आणि महत्त्वाची मंत्रीपदे देखील या नेत्यांकडे होती. मात्र आता सांगली जिल्ह्याच्या वाट्याला एकही मंत्रीपद नसल्याची खंत सांगलीकर व्यक्त करत आहेत.  महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात एक मंत्रिपद रिक्त आहे. सांगलीतील बड्या नेत्याच्या प्रतीक्षेमुळे महायुतीने हे पद राखून ठेवले आहे का? अशी चर्चा सध्या सांगलीत रंगली आहे. 


जयंत पाटील सरकारमध्ये सहभागी होणार?


सांगली जिल्ह्यातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना सांगलीच्या मतदारांनी निवडून दिले. मिरजेतून सुरेश खाडे यांना तब्बल चौथ्यांदा, तर सांगलीतून सुधीर गाडगीळ यांना तिसऱ्यांदा विधानसभेत पाठविले. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकनिष्ठ असणारे जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे मंत्री होणार अशी चर्चा होती. राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचे सूतोवाच त्यांनी केलेय. मंत्रिमंडळ विस्तारात सांगलीला मंत्रीपदाची संधी मिळाली नाही. त्यामुळे भविष्यात जयंत पाटील यांचा सरकारमध्ये सहभागी होणार असल्याने सांगलीच्या मंत्रीपदाची संधी हुकली असल्याची चर्चा सुरू आहे.


गोपीचंद पडळकर यांचा पत्ता का कट?


सांगली जिल्ह्यातून मंत्रीमंडळात माजी मंत्री सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर यांना संधी मिळणार असल्याची चर्चा होती. या दोघांमध्ये पालकमंत्री पदावरून देखील जोरदार रस्सीखेच सुरू होती. पालकमंत्री पद कुणाला द्यायचे यावर मात्र शेवटपर्यंत एकमत न झाल्याने सांगली जिल्ह्यातून मंत्रिपद देण्याचा विषय सध्या मागे ठेवण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे. दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या आठवडाभरात शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. याविषयीची नाराजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली. त्यामुळेच पडळकर यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाला असावा, अशी भाजपच्या गोटात चर्चा आहे. दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीमध्ये काका-पुतण्याची भेट, हेही कारण असू शकते. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी एक होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात मंत्रिपद वाटप करण्यात आले नसल्याचे बोलेल जात आहे. 


आणखी वाचा 


Eknath Shinde Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेच्या आमदारांची आदळआपट; एकनाथ शिंदे नाराज, कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!