Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (9 ऑगस्ट) झाला खरा, पण त्याआधी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत. शिंदे गटातील (Shinde Group) तीन मंत्र्यांच्या नावाला भाजपचा (BJP) विरोध होता, अशी माहिती आता एबीपी माझाला मिळाली आहे. दीपक केसरकर (Deepak Kesarkar), अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला भाजपने विरोध केला होता, असं समजतं. पण एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.


दीपक केसरकर यांची शिंदे आणि ठाकरे गटातील दुरावा कमी करणारी वक्तव्यं आणि राणेंबरोबरचा वाद यामुळे भाजप त्यांच्या नावाला अनुकूल नव्हतं. तर अब्दुल सत्तार यांची वादग्रस्त वक्तव्यं आणि टीईटी घोटाळ्यात आलेलं नाव यामुळे भाजपने त्यांच्या नावाला विरोध केला होता असं कळतं. याशिवाय ज्यांच्यावर आरोप केले त्या संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्यासही भाजपकडून विरोध होता असं कळतं. पण आमचे मंत्री आम्हाला ठरवू द्या अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने या तिघांच्या मंत्रिमंडळ समावेशाचा मार्ग मोकळा झाला.


दीपक केसरकर यांच्या नावाला विरोध का?
नांदेडला येण्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरुन दीड ते पावणे दोन तास चर्चा झाली. त्यावेळीच ही खलबतं झाल्याची माहिती एबीपी माझाला माहिती मिळाली. तीन नावांना भाजपचा विरोध होता. त्यातील पहिलं नाव हे दीपक केसरकर यांचं होतं. बंडखोरीनंतर केसरकर यांची वक्तव्ये ही शिंदे आणि ठाकरे यांच्यातील दुरावा कमी करणारी होती. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांना विरोध असो वा ठाकरेंविरोधात बोलून नये अशी आपल्याच पक्षातील नेत्यांना केलेली सूचना असेल तसंच राणे यांच्यासोबतचा वाद कमी होत नव्हता. राणेंबाबत कमी बोलावं, आणि जुळवून घ्यावं असं सांगण्यात आलं. त्यानंतर भाजपचा विरोध काहीसा कमी झाला.


अब्दुल सत्तार यांना विरोध का?
बंडाच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी एकही शब्द काढला नव्हता, कारण त्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आपण बाहेर पडलेलो आहोत. अब्दुल सत्तार यांचं कोणतं हिंदुत्त्व धोक्यात येतंय असंही तेव्हा म्हटलं गेलं होतं. त्यामुळे भविष्यात हिंदुत्त्वाच्या सरकारमध्ये असा एखादा मंत्री नको की त्याच्या एखाद्या वक्तव्यावरुन आपल्याला त्रास होऊ शकतो. परंतु अब्दुल सत्तार यांच्या नावावर एकनाथ शिंदे ठाम होते. कारण पहिले जे चार-पाच लोक होते, ज्यांच्यासमोर शिंदे यांनी भूमिका मांडली होती त्यामध्ये सत्तार होते. आमदारांना एकत्र करुन नव्या प्रकारची समीकरणं समजावून सांगण्यात सत्तार यांचा मोठा  वाटा होता. त्यांचा जनमानसात असलेला वावर यामुळे त्यांना मंत्रिपद डावलणं शक्य नव्हतं.


संजय राठोड यांना विरोध का?
संजय राठोड यांचं मंत्रिपद भाजपमुळे गेलं होतं. भाजपने राज्यभर रान उठवलेलं होतं, आता त्यांनाच मंत्रिपद यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळेल, अशी भाजपची भूमिका होती. त्यामुळे संजय राठोड यांना भाजपचा विरोध होता. 


अखेर मंत्रिमंडळ विस्तार पार पडला
40 दिवसांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी (9 ऑगस्ट) पार पडला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे. खरंतर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्यानंतर दोघांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.