Deepak Kesarkar : मागील 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटातील दीपक केसरकर (Deepka Kesarkar) आणि उदय सामंत (Uday Samant) यांच्या रुपाने कोकणातील दोन सुपुत्रांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषवलेल्या दीपक केसरकरांना महाविकास आघाडी सरकारमध्ये बाहेर राहावं लागलं. परंतु शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. खरंतर दीपक केसरकर आणि बंड हे समीकरण कोणी नाकारणार नाही. राष्ट्रवादीतून बंड करुन शिवसेनेत आलेले दीपक केसरकर हे शिंदे गटाने केलेल्या बंडातही सामील होते. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणारे दीपक केसरकर नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. तिथून त्यांनी शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अखेर शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर ते शिंदे गटात सामील झाले.
"शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता," असा बेडधक आरोप असो वा मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीका सहन करणार नाही, असे म्हणणारे दीपक केसरकर हे कायमच चर्चेत राहिले. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदारांची भूमिका मांडणारे दीपक केसरकर आता कॅबिनेट मंत्री म्हणून नवीन भूमिकेत दिसणार आहेत. त्यांना कोणतं मंत्रिपद मिळतं याची उत्सुकता आहेच. दीपक केसरकर यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता हे जाणून घेऊया...
दीपक केसरकर यांचा राजकीय प्रवास
दीपकर केसरकर यांचा जन्म सावंतवाडीतील सधन कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचा समाजकारण सहभाग असायचा तर दीपक केसरकर यांचा कल राजकारणात होता.
दीपक केसरकर यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. 1996 साली ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष बनले. तर पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेनंतर ते राष्ट्रवादीत गेले.
2009 विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली. यात त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
तळकोकणात केसरकर विरुद्ध राणे हा वाद नवीन नाही. त्यांनी कायमच राणेविरोधी भूमिका घेतली.
2014 च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार केसरकर यांना मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना पाठिंबा दर्शवणं, त्यांचा प्रचार करणं अपेक्षित होतं.
पण राणेविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केसरकर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती.
पवारांनी बिघडलेलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु केसरकर यांनी बंडाचं निशाण फडकवत आमदारकीचा राजीनामा दिला.
दीपक केसरकर यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता, पण युतीच्या समीकरणामध्ये शिवसेनेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
2014 च्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा विजय झाला. कोकणात राणेविरोधी चेहरा म्हणून शिवसेनेने केसरकर यांचा वापर केला
शिवसेनेसोबतच्या पहिल्याच टर्ममध्ये दीपक केसरकर यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली.
केसरकर यांच्याकडे गृह आणि अर्थ या दोन खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली.
देवेंद्र फडणवीसांच्या काळात केसरकर पूर्ण पाच वर्षे मंत्रिपदावर होते.
या काळात त्यांची आणि फडणवीसांची जवळीक वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
2019 मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही.
यावरुन दीपक केसरकर नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती.
यानंतर केसरकर यांनी 21 जूनपासून बंड जाहीर केलं आणि शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून आमदारांची भूमिका मांडू लागले
आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.