Mangalprabhat Lodha: वकील, बिल्डर ते आमदार; आता पुन्हा कॅबिनेट मंत्री, मंगलप्रभात लोढा यांची राजकीय कारकीर्द
Mangalprabhat Lodha Maharashtra Cabinet Expansion: मंगलप्रभात लोढा आमदार म्हणून मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा विधानसभेवर निवडून आले.
Mangalprabhat Lodha Maharashtra Cabinet Expansion: आज महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) नागपुरात पार पडणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून एकूण 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपकडून मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागली. आज मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतील. मंगलप्रभात लोढा आमदार म्हणून मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा विधानसभेवर निवडून आले. शिंदे सरकारमध्ये मंगलप्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्य मंत्रिपदाचा कार्यभार होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुंबईतील चेहरा म्हणून मंगल्प्रभात लोढा यांची ओळख आहे. सोबतच गुजराती, जैन समाजाला भाजपला जोडणारा चेहरा म्हणूनही मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पाहिलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबतची जवळीक असल्याने हिंदुत्वाचा अजेंडा मुंबईत पुढं नेणारे नेते म्हणून मंगलप्रभात लोढा यांची ओळख आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला सत्तेत आणण्यासाठी मंगलप्रभात लोढा मोठं असेट आहेत. गोवंश हत्या बंदी कायद्यात मंगलप्रभात लोढा यांचे मोठे योगदान आहे. तसेच मालाडमधील मालवणीत बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिम राहात असल्याचे दाखले देत मंगलप्रभात लोढा यांनी त्याविरोधात आवाज उचलला होता.
लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने प्रभावित-
मंगलप्रभात लोढा यांनी बी.कॉमचं शिक्षण पूर्ण करुन एलएलबीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर जोधपूरमध्ये ते वकील म्हणून कार्यरत होते. मंगलप्रभात लोढा यांचे वडील न्यायाधीश होते. वडील न्यायाधीश असल्यामुळे वकील म्हणून काम करणं मंगलप्रभात लोढा यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई येण्याचा निर्णय घेतला. 1980 साली मंगलप्रभात लोढा यांनी लोढा ग्रुपची स्थापना केली. 1990 मध्ये निघालेल्या लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने मंगलप्रभात लोढा प्रभावित झाले आणि त्यानंतर 1993 साली भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. देशातील श्रीमंत व्यावसायिकांमध्ये मंगलप्रभात लोढा यांचं नाव आहे.
सलग सहाव्यांदा विधानसभेवर-
देशाच्या आर्थिक राजधानीतील उच्चभ्रू वस्तीचा, मोठे उद्योजक, व्यापारी अशांचा भरणा असणारा मतदारसंघ म्हणजे मलबार हिल विधासभा मतदारसंघ या मतदारसंघात राजभवन, सह्याद्री अतिथीगृह , पेडर रोड, यांसारखे महत्त्वाचे भाग येतात त्यामुळेचं याला राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं स्वरुप प्राप्त झालं आहे. मलबार हिल विधासभा मतदारसंघात 1995 पासून सलग सहावेळा भाजपचे मंगलप्रभात लोढा निवडून येत आहेत. मलबार हिल हा उच्चभ्रूंसह मध्यमवर्गीय मराठी मतदार असलेला मतदारसंघ आहे.
मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती-
मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या 436 कोटी 80 लाख 48 हजार 591 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी जाहीर केले. लोढा यांच्यावर सध्या 182.93 कोटी रुपयांचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर 123.28 कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण 123 कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.