Maharashtra Cabinet Expansion मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (15 डिसेंबर) नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
अशातच महायुतीच्या मंत्रिमंडळाची यादी (Maharashtra Cabinet Minister List) संदर्भात महत्वाची माहीती समोर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी आता दिल्लीदरबारी गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केवळ औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत या यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. तर दुपारनंतर मंत्रिपदावर वर्णी लागणाऱ्यांना संपर्क सुरु होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या नागपुरातील राजभवनात होणार आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष त्यांच्या कोट्यातील काही मंत्रीपद रिक्त ठेवू शकतात अशी शक्यता आहे. दोन्ही पक्षात मंत्री पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे दोन्ही पक्षांकडून काही मंत्रीपद रिक्त ठेवले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर?
दरम्यान राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी तयारीला सुरुवात झाली आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा राजभवनातील लॉनवर होण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांच्या शपथविधीसाठी राजभवनात तेवढ्या क्षमतेचा सभागृह नाही, त्यामुळे राजभवनाच्या लॉनवर शपथविधी सोहळा होऊ शकेल अशी शक्यता आहे.
शिवसेनेचे संभाव्य मंत्री एकनाथ शिंदेंच्या फोनच्या प्रतिक्षेत, यंदा अनपेक्षीत बदल?
नागपूरमध्ये उद्या होणाऱ्या मंत्री मंडळ विस्तारात शपथ घेणारे संभाव्य मंत्री अधिकृत फोनच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर शिवसेनेत अनेक नेत्यांची मंत्री पदासाठी लाॅबिंग सुरू असल्याचेही चित्र आहे. शुक्रवारी रात्री अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीला दाखल झाले होते. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दिपक केसरकर यांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल पहायला मिळेल, अशी ही चर्चा आहे. तर नवीन चेहर्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते आहे. तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदोंकडून नारळ दिला जाणार असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक दिवस बाकी असताना इच्छुक आमदार वर्षा आणि सागरचे उंबरठा झिजवताना पहायला मिळत आहेत.
देवेंद्र फडणवीस संभाव्य मंत्र्यांना फोन करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतरच मंत्रिपदांवर शिक्कामोर्तब होईल. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादी (BJP Cabinet Minister List) समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
कोकण-
1. रविंद्र चव्हाण
2. नितेश राणे
1. मंगलप्रभात लोढा
2. आशिष शेलार
3. अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
1. शिवेंद्रसिंहराजे भोसले
2. गोपीचंद पडळकर
3. माधुरी मिसाळ
4. राधाकृष्ण विखे पाटील
विदर्भ
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
1. गिरीश महाजन
2. जयकुमार रावल
मराठवाडा
1. पंकजा मुंडे
2. अतुल सावे
हे ही वाचा