मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) विस्तार झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये स्थान मिळावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत होते. जमेल त्या मार्गाने लॉबिंग करण्यााच प्रयत्न या नेत्यांकडून केला जात होता. मात्र मंत्रिपदांची संख्या मर्यादीत असल्यामुळे मोजक्याच नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. यामध्येच बीड जिल्ह्याचे नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचादेखील समावेश आहे. ते विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मंत्रिपद दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या राजकीय कारकिर्दी विषयी विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्य विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी जाणून घेऊ या...
पंकजा मुंडेंना तिकीट मिळाल्यामुळे नाराज
धनंजय मुंडे हे भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी बंड करून 2012 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपाने तिकीट दिल्यापासून धनंजय मुंडे नाराज होते. धनंजय मुंडे यांनी 2014 साली पंकजा मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पराभव झाला होता. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानपरिषदेवर आमदारकी दिली होती.
2019 साली पंकजा मुंडेंना केला पराभूत
विधानपरिषदेवर जाताच धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे यांची कारकीर्द मोठी वादळी राहिली. त्यानंतर 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. 2019 नंतर राज्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे हे मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत गेले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील फुटीला धनंजय मुंडे यांचे सहकार्य होते.
राष्ट्रवादीत सर्वाधिक मताधिक्याने विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यानंतर धनंजय मुंडे यांना कृषिमंत्री करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन बहीण-भाऊ एकत्र आले. पंकजा मुंडे यांनी लोकसभेची निवडणूक लढली त्यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासाठी मोठा प्रचार केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख 40 हजार मतांचे मताधिक्य घेऊन धनंजय मुंडे निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणारे आमदार म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. आता धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.
हेही वाचा :