Maharashtra Cabinet Expansionn: अखेर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. मात्र या शपथविधी सोहळ्यात सर्वाधिक चर्चा औरंगाबाद जिल्ह्याची झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपद मिळाली, शिरसाट यांचा पत्ता कट झाला, अब्दुल सत्तार यांना ऐनवेळी संधी मिळाली अशा अनेक कारणांनी आजच्या मंत्रीमंडळाच्या शपथविधीत औरंगाबादची सर्वाधिक चर्चा झाली आहे. 


औरंगाबादला तीन मंत्रिपद...


शिंदे सरकारमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपद मिळाले आहे. ज्यात पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे यांचा समावेश आहे. तर औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना सुद्धा मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. तसेच शेवटच्या क्षणी ज्यांचे नाव समोर आले ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांचा सुद्धा मंत्रीमंडळात समावेश झाला आहे. त्यामुळे एकाच जिल्ह्यात तीन मंत्रिपद मिळाल्याने औरंगाबाद जिल्ह्याची चर्चा पाहायला मिळाली. 


शिरसाट यांचा पत्ता कट...


मंत्रीमंडळ विस्तारात औरंगाबाद जिल्ह्याची आणखी एका गोष्टीने चर्चा झाली ती म्हणजे, संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याने. कारण शिरसाट यांना शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना मंत्रिपद मिळणारच असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र या मंत्रीमंडळाच्या यादीत शिरसाट यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा झाली, पण शिरसाट यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याने औरंगाबादची चर्चा पाहायला मिळाली. 


अब्दुल सत्तारांना शेवटच्या क्षणी संधी...


कालपासून शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा पाहायला मिळत होती. याचवेळी अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात समोर आल्याने सत्तार यांना मंत्रीमंडळातून डावलण्यात येणार असल्याची चर्चा पाहायला मिळाली. शपथविधीच्या तासभरापूर्वी सुद्धा सत्तार यांना शपथविधीसाठी फोन आला नव्हता. मात्र अखेर शपथविधीच्या काही मिनटापूर्वी सत्तार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे सत्तार यांच्याबद्दल कालपासून घडत असलेल्या घडामोडीमुळे औरंगाबादची चर्चा पाहायला मिळाली