Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार शिंदेंची डोकेदुखी?, जुन्यांना संधी दिली तर नवे नाराज? नव्यांना संधी दिली तर जुन्यांचं काय करायचं? 50 पैकी किती जणांना न्याय मिळणार? असे एक ना अनेक प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांच्यासमोर उभे राहिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड करुन आता बराच कालावधी लोटला आहे, त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये आता कुजबुज सुरु झाली आहे. प्रत्येक जण एकनाथ शिंदे यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागला आहे. त्यात मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाची वर्णी लागणार हे गुपित राहिलं आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदार आता शिंदेंची पाठ सोडत नाही, काही आमदार मतदारसंघाऐवजी शिंदेसोबतच कायम दिसत आहेत. त्यामुळे विस्तार हा शिंदेंसाठी तसा तापच बनला आहे. 

एक नजर इतर मंत्री आणि नव्या इच्छुकांच्या यादीवर


- उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे आठ मंत्री एकनाथ शिंदेसोबत आले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, राजेंद्र यड्राव्हकर, संजय राठोड


- तर एकनाथ शिंदेंसोबत प्रमाणिकपणे बंडात सहभागी झालेल्यांपैकी संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, संजय गायकवाड, संजय रायमूलकर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, यामिनी जाधव, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, सुहास कांदे, अनिल बाबर, प्रकाश आबिटकर असे अनेक आमदार शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. 


20 मंत्रिपदांवर कोणाला संधी, अपक्षांनाही अपेक्षा
आता या 50 पैकी शिंदेंच्या वाट्याला फक्त 20 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे, त्यात आता कोणाकोणाला बसवायचं हा मोठा प्रश्न आहे. जे नाराज होतील त्यांना महामंडळांची दारं उघडी ठेवण्यात आली आहेत. पण त्यातही इच्छुकांची संख्या मोठी आहे. 


या सर्व आमदारांच्या गर्दीत अपक्षांची नावं विसरुन कसं चालेल, आशिष जैस्वालांपासून ते गीता जैनपर्यंत सर्वांनाच मंत्रीपदाची अपेक्षा आहे 


जुन्या शिवसैनिकांनाही शिंदेंकडून मोठ्या अपेक्षा
50 आमदार शिंदेसोबत गेले, पण बाळासाहेबांपासून काम करत आलेले शिवसैनिक नेतेही शिंदेंच्या पाठिशी उभे राहिले. रामदास कदम यांनी आपलं दुःख सर्वांसमोर मांडलं, आनंदराव अडसूळ, विजय शिवतारे यांनीही शिंदेना साथ दिली. विधानपरिषदेचे माजी आमदारही शिंदेसोबत आहेत. या जुन्या शिवसैनिकांनाही एकनाथ शिंदेंकडून मोठ्या अपेक्षा आहे. या जुन्या नावांमुळेही नव्यांमध्ये नाराजी पसरु शकते. त्यामुळेच आता नेमकं काय करायचं हा मोठा तिढा एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. 


दिल्लीश्वरांचा आशीर्वाद कोणाच्या डोक्यावर?
मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे-फडणवीस यांच्या अनेक दिल्लीवारी झाल्या आहेत. आमदारांना एकनाथ शिंदे न्याय देतील अशी अपेक्षा आहे. पण दिल्लीश्वरांचा आशीर्वाद कोणाकोणाच्या डोक्यावर असरणार हे लवकरच कळेल. पण सध्या तरी शिंदेंसाठी मंत्रिमंडळ विस्तार डोकेदुखी ठरली आहे एवढं मात्र नक्की.


संबंधित बातम्या


Maharashtra Cabinet Expansion : स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान, कोणाकोणाच्या नावांची चर्चा?