Aurangabad News: औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगांव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपचे माजी आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हारीभाऊ बागडे यांच्या पॅनलच्या पराभव झाला आहे. विशेष म्हणजे बागडे यांचा स्वतःच्याच गावात महाविकास आघाडीने पराभव केला आहे. त्यामुळे चितेपिंपळगांव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवरील बागडे यांची तिस ते पस्तीस वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. महाविकास आघाडीचे तेरा पैकी बारा उमेदवार निवडून आले आहेत. तर बागडे पॅनलचे एकच उमेदवार निवडून आले आहेत. 


चितेपिंपळगांव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते तथा माजी आमदार रामभाऊ आप्पा गावंडे यांचा मुलगा शामराव गावंडे आणि राष्ट्रावचे तालुकाध्यक्ष शिवाजी गावंडे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या शिवशक्ती शेतकरी पॅनलचे 12 पैकी 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर बागडे यांच्या पॅनलकडून एकच उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे बागडे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे. 


यांचा विजय झाला...


हरिभाऊ बागडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने उभं केलेल्या पॅनलमधून गावंडे शामराव रामभाऊ, गावंडे सुभाष एकनाथराव,झिंजुर्डे एकनाथ तुकाराम, झिंजुर्डे वसंत विठोबा, पवार गोवर्धन बासू, लंगडे कुंडलिक रखमाजी, लंगडे श्रीधर रखमाजी, पवार जितेंद्र भिका, पवार हिराबाई गोवर्धन, वीर कडूबाई अशोक, जाधव रामा नाथा, सोनवणे बाळू बाजीराव हे विजयी झाले असून गावंडे विष्णू काशिनाथ यांचा पराभव झाला आहे. तर बागडे यांच्या पॅनलमधून सुरेश गावंडे एकमेव उमेदवार निवडून आला आहे. 


बागडेंना मोठा धक्का


भाजप आमदार हरिभाऊ यांना स्वतःच्याच गावात स्थानिक निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असल्याने त्यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे चितेपिंपळगांव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था सोसायटीवर बागडे यांची गेली तीस-पस्तीस वर्षांपासून एकहाती सत्ता होती. मात्र पहिल्यांदाच त्यांना दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे.