Maharashtra Cabinet Expansion:  मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? या मिलियन डॉलर प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख अखेर ठरली आहे. उद्या (9 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता काही मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता आहे. सगळं ठरलेलं असून शक्य झाल्यास आज रात्रीपर्यंत देखील शपथविधी होऊ शकतो, अशी माहिती आहे. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेतील असं समजतं. विशेष म्हणजे स्वच्छ प्रतिमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना संधी मिळू शकते. तर शिंदे गटाकडून सहा ते सात जणांचा शपथविधी होऊ शकतो. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडत आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदेंचं निवासस्थान नंदनवनमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे विधिमंडळात देखील सचिवांनी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक असल्याचं बोललं जात आहे. 


कोणाकोणाच्या नावाची चर्चा?


भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना संधी
पहिल्या टप्प्यात भाजपकडून ज्येष्ठ मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांच्या नावांची चर्चा आहे.


याशिवाय नितेश राणे यांना पहिल्याच टप्प्यात संधी मिळू शकते, अशही चर्चा आहे. तर आशिष शेलार प्रदेशाध्यक्ष होतात की मंत्री होतात हे देखील पाहावं लागेल. आशिष शेलार यांना पहिल्या यादीत स्थान न देता प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली जाऊ शकते. याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. याशिवाय मुंबईतील आमदार मंगल प्रभात लोढा यांनाही पहिल्या यादीत संधी मिळण्याची शक्यता आहे. 


शिंदे गटाकडून सहा ते सात जणांना थपथ
तर शिंदे यांच्या गटाकडून आधीचे नऊ मंत्री होते त्यांना संधी देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार सहा ते सात जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन ते तीन नावं वगळली जाऊ शकतात. 


स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना स्थान
स्वच्छ प्रतिमा असणाऱ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान द्यायचं असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याचं कारण म्हणजे अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याप्रकरणी आरोप झाले. त्यामुळे त्यांचं नाव पहिल्या यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या