Mumbai: विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2025) आजपासून सुरुवात होणार आहे .दुसरीकडे पुरेसं संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळवण्या एवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत .जर विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तरच विरोधकांना हे पद मिळू शकतं अशा चर्चा सुरू आहेत . या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का?असा सवाल उपस्थित होत असताना विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतेही खास तरतूद नसल्याचं विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना उत्तर दिलंय .विरोधी पक्ष नेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितलं . (Opposition Leader)
ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी 25 नोव्हेंबरला तरतुदींची माहिती मागितली होती .विरोधी पक्षनेते पदाची विविक्षित तरतूद नाही असे सांगण्यात आलंय . दरम्यान ,महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाचं नाव दिले जाणार?अशी ही चर्चा रंगली आहे . ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची तयारी असल्याचही सांगण्यात येतंय .मात्र त्यासाठी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांचा सुद्धा पाठिंबा लागणार आहे आणि त्याची चर्चा सुरू आहे.
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत काय चाललंय?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी आघाडीवर आहे . त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांचे नावसुद्धा चर्चेत आहे. मात्र महाविकास आघाडीकडून विरोधी पक्ष नेते पदाबाबतचे पत्र विधानसभा अअध्यक्षांना नेमकं कधी दिले जाणार? याबाबत स्पष्टता आलेली नाही. शिवाय महाविकास आघाडी कडून एकत्रित निर्णय झाला नसल्याचा कळत आहे. पत्र दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षसुद्धा या विरोधी पक्षनेतेपद देण्यासंदर्भात सकारात्मक आहेत का? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. शिवाय विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालं तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळावं यासाठी काँग्रेस पक्ष दावा करू शकतो .
शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्ष नेत्यासंदर्भात पत्र दिले जाण्याची शक्यता आहे .महाविकास आघाडीचे सर्वाधिक जागा शिवसेनेच्या असल्याने विरोधी पक्षनेते पदावर ठाकरे गट दावा करण्याची शक्यता आहे . दरम्यान, राज्यात सध्या पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरण, राज्याच्या तिजोरीत खडखडाट, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने सुनावलेली शिक्षा, बीड हत्याकांडामुळे चर्चेत आलेले मंत्री धनंजय मुंडेंच्या राजिनाम्याची मागणी आणि शेतकऱ्यांचे वाढते प्रश्न असे गंभीर मुद्दे समोर आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधक नेमकी काय भूमिका घेणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीला पुरेसे संख्याबळ नाही, त्यामुळे विधीमंडळातील भूमिकेची दिशा काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: